रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे समुद्राच्या पाण्यात बोटीतून राईड मारताना कोल्हापूर येथील प्रौढ समुद्रात पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.३० घडली. त्यांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला. विजय बाबासो वनकुद्रे (५५, रा. निर्माण चौक, संभाजी नगर, कोल्हापूर) असे या प्रौढाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय वनकुद्रे हे आपल्या कुटुंबासोबत रत्नागिरीती श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे बुधवारी (२ नोव्हेंबर) देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन करून हे सर्व जण समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. आंघोळ करून झाल्यानंतर त्यांनी बनाना बोटीतून राईड मारण्याचा निर्णय घेतला. राईड मारून परत येत असताना विजय वनकुद्रे बोटीतून पाण्यात पडले. त्यांनी लाईफ जॅकेट घातलेले होते. मात्र, बोटीची दोरी पायात अडकल्याने आणि त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे त्यांच्या पोटात काही प्रमाणात समुद्राचे पाणी गेले.
मोरया वॉटर स्पोर्टसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. त्यांना गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.