कॉक्सिट ज्युनिअर महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व निरोप

औसा प्रतिनिधी-लातूर येथील कॉक्सिट ज्युनिअर महाविद्यालयात विज्ञान व वाणिज्य शाखेतील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. यावेळी हास्य कलावंत बालाजी सूळ यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजनातून परीक्षेला सामोरे जाण्याचा कानमंत्र दिला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, कॉक्सिट ज्युनिअर महाविद्यालयाच्या प्राचार्या तबस्सूम मोमीन, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी, कॉक्सिट महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत गायन, शेला - पागोटे, काव्य वाचन, संगीत खुर्ची आदी कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.हास्य कलावंत बालाजी सूळ यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन करीत बारावीच्या परीक्षेला तणावमुक्त वातावरणात सामोरे जाण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थित पालक, विद्यार्थी व पाहुण्यांची मने जिंकली.

यावेळी डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षा तणावमुक्त, आनंदी वातावरणात द्याव्यात, बारावीत यश मिळविल्यानंतर कौशल्य शिक्षण घेऊन पदवी पूर्ण करण्यापूर्वीच कमावते होण्यासाठी प्रयत्न करावेत, अभ्यासासोबतच कौशल्य शिक्षणावर भर देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या तबस्सूम मोमीन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा. जितेंद्र बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पी. व्ही. पडवळ, डॉ. सुमेध कांबळे, प्रा. उमेसुलेम शेख, प्रा. मयूर होळकुंदे, प्रा. भोगावकर यांनी परिश्रम घेतले.