जिंतूर : शहरातील रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिंतूर तालुका अध्यक्ष किशोर जाधव यांनी जिंतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्याकडे आज दि.२३ रोजी सायंकाळच्या सुमारास केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील शाळा, महाविद्यालय, बस स्थानक परिसरात तसेच हुतात्मा स्मारक कडे जाणाऱ्या रोडवरील खाजगी शिकवणीच्या ठिकाणी काही टवाळखोर तरुण पायी चालणाऱ्या विद्यार्थिनी व युवतींच्या पाठीमागे भरधाव वेगाने मोटरसायकल चालून छेडछाडीचा प्रयत्न करतात. या टवाळखोर मुलांकडून प्रसंगी हातवारे, इशारे करून विद्यार्थिनींना नाहक त्रास देण्याची प्रकार सरासपणे चालू आहे. याचबरोबर शहरातील बस स्थानक या ठिकाणी सायंकाळी ४ ते ५:३० वाजेच्या दरम्यान ग्रामीण भागातील मुली ग्रामीण भागात जाण्यासाठी उभ्या असतात यांना पाहूनही हे तरुण मोठ्या मोठ्याने आवाज करून टिंगल उडवतात.या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिंतूर बस स्थानक परिसरातील ग्रामीण भागातील शाळकरी मुली व महिलांची छेडछाड दररोज चालू आहे. आणि वारंवार वाद होऊन हाणामारी देखील होत आहेत. पोलीस प्रशासनाने तात्काळ या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा व सायंकाळच्या सुमारास गस्त वाढवावी आणि हा प्रकार थांबवावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिंतूरचे अध्यक्ष किशोर जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला.यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष किशोर जाधव, माजी नगरसेवक प्रदीप चौधरी, बाळू राठोड, जगदीश लाहोरे, गजानन होले, राजेश कडेल, मुकेश जाधव, अक्षय जाधव, संदीप शिंदे, योगेश राठोड, अतुल देशमुख, बबन कदम सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.