बीड प्रतिनिधी : – सध्या डिजिटल स्मार्ट युगात मोबाईलमुळे स्वतःच्या सुरक्षितेसह आपल्या कष्टाची जमापुंजी देखील धोक्यात आली आहे. पुर्वी चोऱ्या, घरफोडी,7 रोडरॉबरी आणि दरोडे टाकून लुटले जायचे. पणा आता काळ बदलला आणि चोरटे देखील स्मार्ट चोऱ्या करू लागले आहेत. याचं स्मार्ट चोरट्यांनी बीड मधील 218 जणांना कोट्यावधीचा चुना लावला आहे.

बीड जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यात चालू वर्षातील सात महिन्यात तब्बल 218 जणांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. त्यात जवळपास 2 कोटी रुपयांना या भामट्यांनी गंडा घातला आहे. ‘हॅलो , मी बँकेतून बोलतोय… कस्टमर केअर मधून बोलतोय…तुमचे बँक खाते डिअॅक्टिवेट झाले आहे . तुमच्या मोबाइलवरील लिंक तातडीने क्लिक करा…ओटीपी द्या… तुम्हाला लॉटरी लागली आहे.

तुमच्या खात्यात एक लाख रुपये जमा झाले आहेत, तातडीने बँक डिटेल्स द्या, डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती द्या.. तुमचे वीज कनेक्शन आज मध्यरात्री कट केले जाणार आहे. ताबडतोब बील भरण्यासाठी दिलेली लिंक ओपन करा. असे एक ना अनेक वेगवेगळे फोन , मॅसेज अनेकांना दररोज येतात. यामध्ये अनेकजण या ऑनलाईन चोरट्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. यातून अनेकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील जोगाईवाडी गावातील वाल्मीक मावसकर यांना कॉल करून, तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करायचे आहे. असं म्हणत ओटीपी विचारत, क्रेडिट कार्ड व अकाउंट वरील पन्नास हजार रुपये परस्पर काढून घेत गंडा घातला आहे. अशीच परिस्थिती इतरही तक्रारदारांची आहे.

कष्टाचा पैसा बँकेमध्ये ठेवल्यानंतर अशा पद्धतीचा ऑनलाईन भामट्यांकडून आणि स्मार्ट चोरांकडून दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे. त्यामुळे माझा पैसा मला परत मिळावा, अशी मागणी वाल्मीक मावसकर यांनी केली.यासाठी वाल्मीक यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर विभागात तक्रार केली आहे.

सोशल मीडियावरील फसवणुकीच्या तक्रारीसह ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार खूप वाढले आहेत . या वर्षात 7 महिन्यांमध्ये तब्बल 218 तक्रारी आल्या आहेत. तर अनेक गुन्ह्याची उकल देखील करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र यामध्ये ऑनलाईन लॉटरी ॲपवरून कर्ज आणि कर्ज घेतल्यानंतर अश्लील व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेलिंग देखील केले जात असल्याचं, सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक आर. गायकवाड यांनी सांगितलं.

माहिती तंत्रज्ञानाच्या व डिजिटल युगात स्मार्ट मोबाइल वापरण्याची संख्या वाढली तशी स्मार्ट चोरी करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे स्मार्ट चोरापासून सावधान राहण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील गायकवाड यांनी केले..

त्यामुळे नागरिकांनी बँकेची महत्त्वाची माहिती मोबाइलमध्ये ठेऊ नका .क्रेडिट , डेबिटवरील 16 अंकी नंबर ,पासवर्ड कोणालाही देऊ नका. पॅनकार्ड, आधारकार्ड, ओटीपीची माहिती दूरध्वनी, मोबाइलवरून देऊ नका. या गोष्टीपासून सावधान रहा. कुठलीही बँका डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड , एटीएम ओटीपी बाबत फोनवर कधीही विचारणा करत नाहीत.

तसेच महावितरणकडूनही विज बील भरण्याबाबत संदेश पाठवले जात नाहीत. मात्र अशा भामट्यांच्या जाळ्यात कुठलीही खात्री न करता अनेकजण सहजरित्या अडकतात आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यामुळे असे कॉल, मॅसेज डिलीट करून आपली फसवणूक टाळायला हवी.