गुहागर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर भरमसाठ अवैध वाळू उपसा करण्याचे प्रकार वाढले आहेत. समुद्राची वाळू काढून विकणारी मोठी टोळी सक्रिय झाली आहे. गुहागरमधील वरचा पाट येथील व जांभळा देवी मंदिराच्या मागील बाजूला रात्री दहाच्यानंतर समुद्राची वाळू सिमेंटच्या गोणीमध्ये भरून विकली जात असल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीने वाळू काढून किनारपट्टीची धूप होऊन पर्यावरणाची हानी होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये केली जात आहे.

गुहागरप्रमाणेच हेदवी, पालशेत, नरवण भागात देखील असे प्रकार सुरू असल्याचे जागरूक नागरिकांकडून सांगितले जात आहेत. त्यामुळे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पावसाळा संपल्यानंतर तालुक्यात अनेक भागात बांधकामांना सुरवात झाली असल्याने वाळूला मागणी वाढली आहे. खाडीची वाळू महागडी असल्यामुळे कोणताही शासकीय महसूल न देता फुकटमध्ये मिळत असलेल्या समुद्राच्या वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. अनेक वाळू उपसा करणारे व्यावसायिक अशा पद्धतीने वाळू सर्रासपणे विकत आहेत. हा सर्व प्रकार तहसिलदार कार्यालयाच्या काही मीटर अंतरावर असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल जात आहे. समुद्राची वाळू काढायला मुळात कुठल्याच विभागाची परवानगी नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे शासकीय शुल्क लागत नाही. शिवाय वाळू काढण्याचा खर्च देखील नाही. जेसीबी किंवा फावडे वापरून लागेल तेवढी वाळू काढून रातोरात विकून पैसे मिळवण्याचा धंदा जोरात सुरू आहे. तालुक्यातील प्रत्येक किनारपट्टीवर रात्रीच्या वेळी वाळू काढून विकली जात असल्याचे प्रकार सुरू आहेत. मागच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये पुष्पराज पावसकर यांनी तहसीलदार कार्यालयाला गुहागरमध्ये होत असलेल्या वाळूच्या तस्करीबाबत लेखी तक्रार केली होती. मात्र त्यानंतर ही गुहागरमधील वाळू काढण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडूनच वाळू माफियांना अभय दिले जात आहे का?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.