वाघोलीचा पाणी प्रश्न मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे मागणी

अनिल सातव पाटील यांचे मुख्यअभियंते पावसकर यांना निवेदन

वाघोली /प्रतिनिधी

वाघोलीसाठी भामाआसखेड मधून नवीन पाणीपुरवठा योजना आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील प्रलंबित पाणीपुरवठा योजना सुरू करून वाघोलीकरांचा पाणी प्रश्न सोडवावा याकरिता अनिल सातव पाटील यांनी पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर व सहकारी रणदिवे यांची भेट घेत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

    सोळा महिन्यापूर्वी गावाचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाला असून वाघोलीकर नागरिक मूलभूत सुविधांपासून उपेक्षित राहिले आहेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. अनेक ठिकाणी मोठ्या ग्रहप्रकल्पात, वाड्या- वस्त्यांवर पिण्याचे पाणी पोहोचविणे आवश्यक आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत वाघोली गावासाठी भीमा नदीवरून पाणी नळ पाणीपुरवठा योजना करण्याचा निर्णय झाला होता. परंतु गावाचा समावेश महानगरपालिकेत झाल्यानंतर या योजनेच्या कामाबाबत कोणताही पाठपुरावा झाल्याचे दिसून येत नाही. यासाठी महानगरपालिकेला कोणताही खर्च उचलावा लागणार नव्हता. परंतु कोणताही पाठपुरावा नसल्याने ही योजना पूर्ण झाली नाही. नवीन नळ कनेक्शनची आवश्यकता असून संबंधित अधिकारी अपुऱ्या प्रमाणात पाणी असल्याने नवीन कनेक्शन देत नाहीत. 

    वाघोलीसाठी भामा आसखेड मधून पिण्याचे पाणी मिळाल्यास नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करता येईल. व बहुतांशी भागात पिण्याचे पाणी पोहोचले पाण्याची समस्या सुटेल. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून पाणीपुरवठा विभाग मुख्य अभियंत्यांनी सकारात्मकता दाखवत संबंधित विभागाची त्वरित बैठक घेऊन या मागणीची दखल घेणार असल्याचे व मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे सांगितले.

**बाईट**

अनिल सातव पाटील

( भाजपा यु.मो. हवेली तालुकाध्यक्ष) 

आपले वाघोली शहर पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन आजवर १६ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र महानगरपालिकेकडून आजतागायत पाणी प्रश्नासाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच पीएमआरडीए कडुन आम्ही २०१९ मध्ये मंजूर केलेली जवळपास २२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना सुद्धा अजून रखडलेली आहे हि योजना पुर्ण करण्यासाठी मागील दोन वर्षांपासुन आम्ही पाठपुरावा करत आहोत यासाठी पीएमआरडीए कार्यालय औंध येथे आंदोलन देखील करण्यात आले होते तसेच वाघोली गाव महानगर पालिकेत समाविष्ट झाल्यापासुन भामा आसखेड येथून वाघोलीला आणखीन एक नवीन पानी पुरवठा योजना व्हावि यासाठी प्रयत्न करत आहोत व यानंतरही सातत्याने यासाठी लढा देत राहणार.