राज्यात २ हजार कोटींच्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजुरी, रांजणगाव येथे होणार प्रकल्प

तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी:

            पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारले जाईल, अशी घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत केली.

             सीजीओ कॉम्प्लेक्समधील सीइजी सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रशेखर यांनी रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल तसेच सीडॅकच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा केली. रांजणगाव (फेस III) येथील होऊ घातलेल्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) मुळे येत्या काळात जवळपास पाच हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचे चंद्रशेखर म्हणाले. या प्रकल्पासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पाठपुरावा केला असल्याचे चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले. ईएमसीच्या प्रकल्प विकासासाठी एकूण ४९२.८५ कोटी रूपये अंदाजित खर्च येणार असून २०७.९८ कोटी रूपये केंद्र सरकार तर २८४.८७ कोटी रूपये महाराष्ट्र शासनच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाव्दारे गुंतविले जातील. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन हजार कोटी रूपयांची गुंतवणूक भविष्यात आकर्षित केली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

             इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग मंजूर करून क्लस्टर राज्याला मोठी भेट दिल्याबद्दल बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

*एक हजार कोटी गुंतवणूक*

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, इंडिया ( सी डॅक) ही संस्था पुण्यात आहे. या संस्थेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंगचा एक प्रकल्पही महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पाची किंमत साधारण एक हजार कोटी रूपये असणार असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले. 

*५००० रोजगार निर्मिती*

 केंद्र सरकारने राज्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केल्यामुळे २००० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून ५००० रोजगार निर्मिती होईल. राज्यात शिंदे फडणवीस सरकारमुळे पुन्हा एकदा गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य ठरेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.