बीड (प्रतिनिधी) शहरातील अहमदनगर रोड वरील तहसील च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या नालीत सिमेंट पाईप टाकण्यात आले. याविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या बातमी ची दखल तहसीलदार सुहास हजारे यांनी घेतल्याने अभ्यागतांचा त्रास कमी झाला आहे.याविषयी सविस्तर वृत्त असे की, "हजारे साहेब तहसीलचे मेन गेट उघडले आभार !" "आता दोन्ही गेट समोरील नाली बनवून स्लॅब टाकायला लावा" या शीर्षकाने सा.प्रबुध्द लोकशाही ने बातमी प्रकाशित केली होती.याची दखल घेऊन तहसीलदार सुहास हजारे यांनी गेट समोरील नालीत सिमेंट पाईप टाकून त्यावर मुरूम टाकत आपल्या कर्तव्यदक्षतेची चुणूक दाखवली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड शहरातील तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उघडी नाली आणि काँक्रिटीकरण नसल्याने कार्यालयात ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसह दुचाकी स्वारांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली होती व त्रासही वाढला होता. ही बाब हेरुन या त्रासाचे वर्णन करत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधले होते.याची दखल घेऊन कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेले सुहास हजारे यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या नालीत सिमेंट पाईप टाकून त्यावर मुरूम टाकून घेतले.यामुळे आता पादचाऱ्यांसह दुचाकीने ये-जा करणाऱ्या अभ्यागतांची अडचण दूर होऊन त्रास कमी झाला आहे.यामुळे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी आभार व्यक्त केले असून बीड नगर परिषद च्या माध्यमातून तहसीलदार सुहास हजारे हे जातीने लक्ष घालून साईट पंख्या पासून ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत काँक्रीटीकरण करून घेतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.