दापोली : आपल्या चिमुकल्यासाठी जीव धोक्यात घालून पेटत्या गाडीतून आई - बापाने चिमुकल्याला वाचवल्याची थरारक घटना दापोली येथे घडली आहे.
मौजेदापोली येथील प्रसाद जोशी हे मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी आपल्या कुटुंबासह पुणे येथून कारने दापोलीला जात होते. जोशी व त्यांचा मोठा मुलगा आराध्य हे पुढच्या सीटवर बसले होते. दोघांनीही सीट बेल्ट लावलेला होता. तर मागच्या सीटवर पत्नी विज्ञा व लहानगा प्रभव बसले होते. जोशी आणि त्यांची पत्नी गप्पा मारत होते.
प्रभवला नंतर सीटवरच झोपवले होते. मंगळवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास त्यांची गाडी मौजेदापोली येथे आली. यावेळी चालक प्रसाद जोशी यांना झोप आली. याचवेळी गाडी रस्ता सोडून बाहेर गेली आणि विरुद्ध दिशेला जाऊन आंब्याच्या झाडावर जोरदार आदळली. हा वेग एवढा होता की, गाडीने लगेचच पेट घेतला. गरम झालेल्या गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच विज्ञा जोशी यांनी प्रसाद जोशी यांना हलवून जागे केले. त्यानंतर प्रसाद याना जाग आली. काहीतरी घडलं आहे हे कळताच त्यांची झोपच उडाली. गाडीने हळूहळू पेट घेतला होता. लगेचच मोठा मुलगा आराध्यचा सीटबेल्ट काढला व पत्नी विज्ञा, मुलगा आराध्याला गाडीबाहेर पडले. मात्र 4 वर्षांचा चिमुकला प्रभव गाडीतच राहिला होता. तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता. जवळपास अर्धी गाडी जळली होती. अंगावर सामान पडल्याने जळत्या गाडीतच प्रभव अडकून राहिला होता. आपला लहानगा प्रभव गाडीतच राहिला आहे याची जाणीव होताच त्यांनी टाहो फोडला. घाबरलेल्या अवस्थेत दोघांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. जीवाची पर्वा न करता जळत्या गाडीत शिरले. त्याच्या अंगावर पडलेले सामना बाजूला करून प्रभवला बाहेर काढले. यात सर्वांना किरकोळ जखमा झाल्या. गाडीतील दिवाळीचा सर्व फराळ, कपडे दागिने, पैसे सगळं गाडीमध्येच जळून खाक झाले होते. स्थानिकांनी दापोली पोलिसांना व नगर पंचायतीच्या अग्निशामक यंत्रणेलाही कळवले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या जीवघेण्या अपघातातून जोशी कुटुंब वाचल्याने त्यांनी निसर्गाचे आभार मानले.