राजापूर : तालुक्यातील साखरी नाटे येथून मच्छी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून मच्छीचे पाणी सर्रास रस्त्यावर सोडले जात असल्याने दुर्गंधी आणि अपघाताची शक्यता असल्याने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मच्छी वाहतूक करणारे काही वाहनचालक, वाहतूकदार उद्दाम व अरेरावीची भाषा वापरून धमकावीत असल्याचे बोलले जात आहे.

राजापूर तालुक्यातील साखरीनाटे या बंदरात मोठ्या प्रमाणावर माशांची आवक होत असते. यातील बरीचशी मच्छी रत्नागिरी, मुंबई कोल्हापूर सोबतच जवळच्या कर्नाटक राज्यात वाहतूक होत असते. ही वाहतूक होत असताना सर्रास माशांचे पाणी सोडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कॉक सोडून दिलेला असतो आणि संपूर्ण रस्त्यावर पाणी वाहत सोडलेले असते.

 सागरी महामार्गावरील जैतापूर येथील तीव्र चढावावर अशाप्रकारे पाणी सोडले जात असल्यामुळे अनेकांनी अनेक वेळा वाहनचालकांना असे न करण्याविषयी सूचना आणि विनंती देखील केलेल्या आहेत मात्र याकडे पूर्णत दुर्लक्ष करण्याबरोबरच तुम्हाला काय करायचे ते करून घ्या?

 आमच्या गाड्या अशाच पद्धतीने सुरू राहणार. कोणाकडे तक्रार करायची ती करा आम्ही कोणालाच भीक घालत नाही. अशाप्रकारे उद्दाम व अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे बोलले जात आहे. अशाप्रकारे उद्दामपणे वागणाऱ्या या वाहतूकदारांना नक्की कोणाचे अभय आहे?

 सर्व प्रशासकीय यंत्रणा खिशात असल्यासारखे हे का वावरतात?

मत्स्य व्यवसाय विभागाची किंवा पोलीस यंत्रणेचीही यांना भीती वाटत नाही? सर्वसामान्यांना धमकावण्याबरोबरच गाडीखाली चिरडून टाकू अशाही वल्गना केल्या जात असल्याची चर्चा सुरू आहे.

मच्छीचे पाणी रस्त्यावर सोडल्याने अनेक वेळा दुचाकी घसरण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. तर रस्त्यालगत वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीही पसरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. तर धाऊलवल्ली येथील प्रवासी जेटीवर मोठ्या प्रमाणावर मच्छीचा उपसा केला जात असून अनेक वेळा ग्रामपंचायतीकडून यावर कारवाई होण्याची मागणी केली असताना सुद्धा मत्स्यव्यवसाय विभागाकडून दुर्लक्ष का केले जाते ?

या जेटीवर देखील अनेक वेळा अस्ताव्यस्त वाहने लावण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर घाण पसरविण्यात येत असते. या जेटी जवळ दोन मंदिरे असून माशाची घाण आणि दुर्गंधीमुळे भाविकानाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या जेटीवर असलेला सूचना फलक की फेकून देण्यात आल्याची चर्चा आहे. 

बाजूलाच पोलीस चौकी देखील आहे अनेक वेळा वादविवादाचे प्रसंग देखील या जेटीवर पहावयास मिळतात काही उन्मत्त व हेकेखोर व्यवसायिकांनी मुळे सर्वसामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागत असल्याची अनेक जण बोलून दाखवत आहेत.

उद्दाम व अरेरावीने वागणाऱ्या काही वाहतूकदार व व्यावसायिकांवर संबंधित मच्छिमार सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी अंकुश ठेवावा अशी मागणी आहे. मत्स्य व्यवसाय विभाग व पोलिस प्रशासनाने ही उद्दाम व अरेरावीने वागणारऱ्यांवर अंकुश ठेवावा अशी मागणी आणि अपेक्षा व्यक्त केली जात आहे.