मुंबई -पुणे महामार्गावर अपघात होऊन पाचोडचे माजी सरपंच अंबादास नरवडे ठार
पाचोड/मुंबईहुन खाजगी कामे आटोपून कारने गावी परतणाऱ्या कारचा मुंबई - पुणे रस्त्यावर कामशेत -बहुरगावजवळ अपघात होऊन पाचोड (ता. पैठण) येथील माजी सरपंच अंबादास नरवडे (वय ५० वर्षे) हे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता.१९) पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास घडली.
यासंबंधी अधिक माहीती अशी, पाचोड येथील अंबादास हरिश्चंद्र नरवडे (वय ५०) हे त्यांचे मित्र सुरेश भावले (रा.औरंगाबाद) यांचे सोबत खाजगी कामानिमित सोमवारी (ता.१७) सायंकाळी मुंबई येथे गेले होते. त्यांनी मंगळवारी (ता.१८) आपले काम केल्यानंतर सायंकाळी ते गावी येण्यासाठी निघाले असता मुंबई - पुणे रस्त्यावर कामशेत -बहुरगाव जवळ त्यांच्या कारला बुधवारी (ता .१९) पहाटे पावणेचार वाजता अपघात झाला. यांत त्यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले,तर सुरेश भावले हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहीती मिळताच राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. दुपारी अडीच वाजता त्यांचेवर पाचोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अंबादास नरवडे हे शिवसेनेचे सर्कलप्रमुख तर पाचोडचे माजी सरपंच होते. सन १९८५ पासुन ते राजकारणात मंत्री भुमरे सोबत सक्रीय होते. ते मंत्री भुमरे यांचे कट्टर समर्थक व विश्वासु होते. ते मितभाषी व रोखठोक स्वभावामुळे सर्वांशी परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पाचोड येथील नागरिकांनी सर्व व्यवहार, दुकाने बंद करुन दुखवटा पाळला. अनेक चाहते, मित्र, आप्तेष्टांनी अपघातस्थळी धाव घेतली.