रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यासह लांजा, राजापूर, संगमेश्वरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झंझावात कायत असल्याचे या निकालावरुन सिद्ध झाले आहे. जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखविला, त्याबद्धल आम्ही जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी येथे जमलो आहे. कोणाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि कोणाचा कमी झाला आहे, हे ज्याचे त्यांनी ठरवावे, मात्र शिवसेना या सर्व तालुक्यात मजबूत आहे आणि आहे तिथे आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी दिली.

आमदार राजन साळवी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तालुका प्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे, उपजिल्हाप्रमुख सुजित कीर, शहर संघटक प्रसाद सावंत, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. चाळके म्हणाले, “उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद दाखवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आजही ग्रामीण भागातील जनतेचे प्रेम आहे, हे यावर स्पष्ट होत आहे.

रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात बहुतेक ग्रामपंचायतींवर ठाकरे शिवसेनेचा सरपंच बसला आहे. राजापूर तालुक्यात १० पैकी ८ ग्रामपंचयातीवर ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकला आहे. लांजा तालुक्यात १५ पैकी ९ ग्रामपंचायतीवर सेनेचे सरपंच निवडूण आले आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेते राजन साळवी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी झटून काम केल्याने हे यश प्राप्त झाले आहे.

शिरगाव ग्रामपंचयातीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून थेट सरपंचपदावर आमचा उमेदवार दिला असला तरी तेथे आम्हाला बहुमत मिळविता आलेले नाही. मात्र आघाडीचा प्रयोग तेथे यशस्वी झाला आहे. आम्ही आघाडी म्हणून निवडणुकी लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिरगावमध्ये नेमक्या काय चुका झाल्या, याबाबत आम्ही नक्कीच विचार विनिमय करून त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू, फणसोप ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे सेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे तेथे सरपंचपदासह ११ जागांपैकी १० जागा आम्हाला मिळाल्या.