पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक लावा
जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
( शिरुर प्रतिनिधी ) पुणे नगर महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग असून या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांची डोकेदुखी होत असल्यामुळे या पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक लावावी अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर सह पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा, सणसवाडी, रांजणगाव औद्योगिक वसाहत व सुपा औद्योगिक वसाहत येथील औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहन व लहान मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच नगर पुणे महामार्गावर अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ व कारखानदार यांनी बेकायदेशीर दुभाजक तोडल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच रस्त्यावर बेकायदेशीर वाहतूक पार्किंग व महामार्ग पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तर या कोंडी मुळे अनेक अपघात होत असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच पुणे नगर महामार्ग हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असून या महामार्गा वरुन मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे सदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी पुणे येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन याविषयी निवेदन देत पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक लावावी अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी देखील सदर निवेदनाचा विचार करत आपण लवकरात लवकर बैठक लावू असे आश्वासन देखील नाथा शेवाळे यांना दिले आहे.