औरंगाबाद :-

 घरी कोणीही नसताना १२ वीत शिकणाऱ्या एका अठरा वर्षीय तरूणीने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बजाजनगर येथे घडलेली ही घटना गुरूवारी ( ताा ६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

बजाजनगर येथील जय भवानी चौकाजवळील आर एम २४९ मधील फोरबस हौसिंग सोसायटीत संजय रणनवरे हे कुटुंबासह नरेंद्र खरात यांच्या घरात भाड्याने राहातात. रणनवरे हे येथील एका खाजगी कंपनीत कामगार असून त्यांची पत्नीही एका कंपनीत कामाला जाते. नेहमीप्रमाणे पतीपत्नी गुरूवारी (ता.६ ) रोजी कामावर गेलेले असतांना त्यांची अठरा वर्षीय मुलगी निकीता हिने स्वयंपाक घरातील छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती १२ वीच्या वर्गात शिकत होती. सायंकाळी ५  वाजेच्या सुमारास निकीताचे आईवडील कंपनीतून घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मदनसिंग घुणावत यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत निकीताला फासावरून खाली उतरवत रुग्णवाहिकेतून घाटीत रवाना केले. मात्र तेथील डाॅक्टरांनी निकीताला तपासून मृत घोषित केले. दरम्यान निकीताने आत्महत्या का केली यांचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मदनसिंग गुनावत करीत आहे.