मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षण बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या बाबत भाजपा चे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात असे सांगितले आहे की, मराठा समाजातील समाज बांधव म्हणून आपण राज्याच्या प्रमुखपदी विराजमान झाला त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आपले सर्वसामान्य जनतेचे सरकार राज्यात आले म्हणून जनता देखील खऱ्या अर्थाने “आपले सरकार 'म्हणू लागली. परंतू मंत्री तानाजी सावंत यांच्या मराठा आरक्षणाच्या बेताल वक्तव्याने आपल्या सरकारच्या प्रतिमेस तडा जात आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी " सत्तांतर झाले की लगेच आरक्षणाची खाज सुटली " असे वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावनांचा अश्लाघ्य भाषेत उपमर्द करून समाजाचा अपमान केला आहे, राज्यातील मराठा संघटना कायदेशीर कक्षात बसणारे आरक्षण मागत आहेत तर काही संघटना या ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण द्या म्हणून मागणी करत आहेत, ओबीसी मधूनच आरक्षण द्या ही कोणत्याही एका पक्षाची भूमिका नाही समाजातील सर्व घटक संघटना आपआपल्या स्तरावर विविध भूमिका घेऊन आरक्षणाची लढाई लढत आहे या सर्वांच्या भूमिकेचा भावनांचा, उपमर्द न करता सामंजस्यपूर्ण आश्वस्त करणे अपेक्षित आहे.महाराष्ट्रत राजकीय सत्तांतर झाले म्हणून मराठा समाजाने विरोधीपक्षाच्या सांगण्यावरून आंदोलन सुरू केले सांगणे म्हणजे मंत्री सावंत यांनी मराठा समाजावर आरोप करण्यासारखा आहे.

तरी या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्री महोदय आपण स्वतः लक्ष देऊन मंत्री सावंत यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्या बाबत तंबी देऊन आवर घालावी अशी विनंती. धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.