औरंगाबादला २२ वर्षांनी मिळाला स्वत:चा पालकमंत्री; संदीपान भुमरेंकडे मोठी जबाबदारी  

औरंगाबाद(विजय चिडे): मुख्यमंत्री सचिवालयाने शनिवारी रात्री राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहिर केली. या यादीनुसार औरंगाबादचे  पालकमंत्रीपद पैठण विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आले. भुमरे यांच्यामुळे तब्बल २२ वर्षानंतर औरंगाबाद जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाल्याने शिंदेगटाने भुमरे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला.

राज्यात १९९५ साली शिवसेना भाजपचे शिवशाही सरकार आले होते. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असलेल्या मंत्रीमंडळात औरंगाबादचे स्थानिक आमदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे औरंगाबादजिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.यानंतर काँग्रेस, आघाडी सरकार आले तेव्हा बाहेरील जिल्ह्यातील पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे पाटील,बाळासाहेब थोरात या मंत्र्यांकडे औरंगाबादचे पालकमंत्रीपद होते. २०१४ ते २०१९ या भाजप-सेनायुतीच्या सरकारमध्येही औरंगाबादचे पालकमंत्रीपदी रामदास कदम, एकनाथ शिंदे होते.

दरम्यान  दिड महिन्यापूर्वी राज्यात सत्तारुढ झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आजखेर राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावाची यादी घोषित केली. औरंगाबादचे पालकमंत्रीपद रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आले. भुमरे यांच्यारुपाने तब्बल २२ वर्षानंतर औरंगाबादला स्थानिक पालकमंत्री मिळाला.

भुमरे यांच्या कार्यालयासमोर समर्थकांचा जल्लोषमंत्री भुमरे यांची औरंगाबादच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याचे कळताच त्यांच्या सूतगिरणी चौकातील संपर्क कार्यालया समोर समर्थकांनी फटाके फोडून आणि ढोल वाजवून जल्लोष केला. यावेळी शिंदेगट जिल्हाप्रमुख रमेश पवार, माजी जि.प. सभापती विलास भुमरे,रामराव शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.