परभणी,दि.24 : कमी कालावधीत येणाऱ्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणाचा शेतकऱ्यांमध्ये अधिक प्रसार होणे आवश्यक आहे. कारण कमी कालावधीची पिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकेल असे प्रतिपादन कृषि मंत्री अब्दूल सत्तार यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाड कृषि विद्यापीठ परिसरात आयोजित शेतकऱ्यांना बियांणे वाटप कार्यक्रमात श्री. सत्तार हे बोलत होते. यावेळी कुलगुरु डॉ. इंन्द्र मणि, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कृषी मंत्री श्री. सत्तार पुढे म्हणाले की, कुलगुरु, शास्त्रज्ञ आणि कृषि अधिकारी यांनी काम करतांना शेतकऱ्यास केंद्रबिंदू समजून कामे करावीत. तसेच विद्यापीठाने मागील दहा वर्षात कोण-कोणते वाण, तंत्रज्ञान विकसीत केले, कोणत्या वर्षी विकसीत केले, कोणत्या पिकांचे केले याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. तसेच शेतकऱ्यांना जमीन, हवामानाबद्दल यासह पेरेणीची वेळ, वातावरण, हवामान याची तंतोतंत माहिती दिल्यास, जुन्या पध्दतीची शेती सोडून, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व नवीन शेती पध्दती अवलंबण्यास मदत होईल. आज जे नव-नवीन कृषि विषयक तंत्रज्ञान विकसीत झाले आहे, त्या पध्दतीने शेती केल्यास शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. विद्यापीठाने अनेक कमी खर्चीक तंत्रज्ञान विकसित केले आहेत, पिकांची अनेक चांगली वाण देखील विकसित केले आहे, हे सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहचले पाहिजे. तसेच पिकांवर येणाऱ्या नवनवीन कीड-रोगांच्या प्रतिबंधासाठी आणि यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक संशोधन केले पाहिजे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या व अडी-अडचणी जाणुन घेण्यासाठी राज्यात ‘माझा एक दिवस बळीराजा सोबत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांसोबत लोकप्रतिनीधी, प्रशासकीय अधिकारी दिवसभर राहणार असून त्यांची दिनचर्या जाणुन घेत आहे. या दरम्यान त्यांच्या समस्या व अडी-अडचणी जाणुन घेवून होणाऱ्या आत्महत्याचे कारणे देखील जाणुन घेण्यात येत आहे. उपक्रमाद्वारे बळीराजांची खरी परिस्थिती लक्षात आली. शेतकऱ्यांनी पिक कापणी केल्यास त्यांना योग्य भाव मिळत नाही. ज्या गावात गेले त्या गावात ग्रामसभा घेवून शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी आणि प्रश्न समजवून घ्यायचे आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेवून धोरण तयार करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना काय मदत करेल आणि शेतकरी बांधव कसा सक्षम होईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे आहे. राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे राज्यभर विविध जिल्ह्यात दौरे करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत-बांधावर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी व प्रश्न समजवून घेतल्या जात असल्याचे श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले.
तसेच शेतकरी जो माल पिकवितो त्याला भाव देखील मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाच्या हमी भावाची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. विद्यापीठाने कापुस, सोयाबीन, हरभरा आदी पिकांवर संशोधन करुन कमी दिवसात जास्तीत-जास्त उत्पन्न कसे घेता येईल अशा अनेक अपेक्षा शेतकऱ्यांच्या कृषि विद्यापीठाकडून असुन, विद्यापीठाने यासाठी प्रयत्न करावे. शेतकऱ्यांना आज बियाणे वाटप करण्यात आले असुन, अनेक लाभार्थ्यांना बियांणाचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान महोदयांची इच्छा आहे की, राज्यातील शेतकरी हा दीड ते दोन पटीने उत्पन्न घेणारा तयार व्हावा. परंतू यासाठी त्यास नवीन तंत्रज्ञानाचे, चांगल्या दर्जाचे, चांगल्या उगमशक्तीचे संकरीत बियाणे द्यावे लागतील. शेतकऱ्यांचे काही तक्रार किंवा प्रश्न असल्यास त्याकरीता जिल्ह्यात वॉर रुमची सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.
मागील काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात शेतावर-बांधावर जाऊन भेट देवून पाहणी करुन त्याचा पंचनामे व अहवाल मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आला. तसेच शेतकरी हा आस्मानी संकटात सापडला असून त्यास नुकसान भरपाई द्यावी लागेल असे प्रश्न मांडले असता, त्यानुसार 27 लाख हेक्टर जमीनवरील नुकसान भरपाईसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर महिन्यात वितरीत करण्यात आले आहे.
आज शेतकरी बांधवापुढे मजुरांचा मोठा प्रश्न असुन ड्रोन तंत्रज्ञानाचा फवारणी करिता वापर केल्यास कमी वेळात फवारणी करणे शक्य होणार आहे. विद्यापीठाने ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण आयोजित करावेत. ड्रोन खरेदीस मोठा खर्च येतो, याकरिता शेतकरी बांधवांनी गटाच्या माध्यमातुन एकत्रित येऊन ड्रोन खरेदी करावे. विद्यापीठाने इथेनॉल किंवा जैवइंधनावर चालणारे ड्रोनची निर्मिती करावी. तसेच नवीन योजना किंवा नवीन बांधकामासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला येणाऱ्या मार्च पर्यंत 50 कोटी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. हे अनुदान आपण शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी व त्यांना सक्षम होण्यासाठी उपलब्ध करुन देणार आहे. तसेच कृषि संशोधानासाठी आवश्यक तेवढा निधी देखील उपलब्ध करुन दिला जाईल अशी ग्वाही यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले. तसेच वसंतराव नाईक मराठवाड कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंन्द्र मणि यांनी देखील आपले यावेळी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातंर्गत लाभार्थ्यांना रब्बी हंगामाकरीता बियाणांचे तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत कृषि मंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी तयार केलेल्या कृषि विषयक घडी पत्रिकेचे श्री सत्तार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच यावेळी कृषि मंत्री श्री. सत्तार यांनी वसंतराव नाईक मराठवाड कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात आयोजित कृषी प्रदर्शनाची पाहणी केली.
यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी बांधवाची उपस्थिती होती.