परळी
समाजातील वंचित, पिडित व गरजू लोकांना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आता टीबी रूग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी टीबीचे दोन रूग्ण दत्तक घेऊन त्याच्या उपचाराची संपूर्ण काळजी घेणार असल्याचा स्त्युत्य संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला आहे.
यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की,सेवा पंधरवाडाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्म दिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहेत. हे कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व्हावेत अशी अपेक्षा आहे. आज आदरणीय मोदीजीनां वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत असताना त्यांनी जो मार्ग आम्हाला दिला आहे, त्याप्रमाणे आज टी. बी. चे दोन पेशंट दत्तक घेत आहे. याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला कोणत्याही प्रकारचे टी.बी. चे दोन पेशंट गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान दत्तक घेईल आणि त्यांच्या उपचाराची सर्वोतोपरी काळजी घेण्यात येईल. पुढील १५ दिवस इतर अनेक सामाजिक उपक्रम करण्यात येणार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
••••