. . . . अखेर खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतरच मृतदेह घेतला ताब्यात,आठ दिवसानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार : सोनवाडी शिवारातील घटना
पाचोड,(विजय चिडे) चार दिवसापूर्वी सोनवाडी खूर्द (ता पैठण) शिवारात सतरा वर्षीच युवकाचा सापडलेला मृतदेह हे खून की आत्महत्या या विषयी संभ्रम निर्माण झाला होता ,मात्र नातेवाईकांनी सदर आत्महत्या नसून खुन करण्यात आला असल्याचा आरोप करीत संबंधीत मारेकऱ्यावर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी मज्जाव केल्याने चार दिवसापासून मृतदेह औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातच पडून राहीला. अखेर पाचोड (ता पैठण) पोलिसांनी खादगाव (ता पैठण) येथील चार जणांविरुध्द शनिवारी (ता.१०) रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी( ता. ११) संशयीतास गजाआड केल्यानंतर मयताच्या नातेवाईकानी मृतदेह ताब्यात घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली.
सोनवाडी खूर्द (ता.पैठण) येथील सतरा वर्षीय युवक जयसिंग चकणेश चव्हाण हा रविवारी (ता.चार) शिकार करण्यासाठी खादगाव (ता पैठण) शिवारात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला तो घरी परतलाच नाही . त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला असता चौथ्या दिवशी गुरुवारी (ता.आठ) दुपारी एक वाजेच्या सुमारास श्रीपत छबु भोसले यांच्या शेतातील कपाशीच्या पिकांत कुजलेल्या अवस्थेत जयसिंग याचा मृतदेह सापडून आला होता . यावेळी पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे, पोलीस नाईक पवन चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून त्या युवकाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे शासकीय घाटी रुग्णालयात पाठविला. शुक्रवारी (ता. नऊ) दुपारी जयसिगच्या मृतदेहाची उत्तरणीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकाना नेण्यास सांगितले असता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत खादगाव येथील चौघां जणांनी त्यांचे शेतात जयसिग चव्हाण शिकारीसाठी गेल्याचा राग धरून त्यांस खून करण्याची धमकी दिली होती व त्यांनीच खून केला असून जोपर्यंत त्यांचेवर खूनाचा गुन्हा दाखल होत नाही , तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला . पोलिसांनी पाचोडला चला व तक्रार दया , गुन्हा दाखल करतो असे सांगितले तरी त्यांनी घाटीतच एफ आय आर नोंदवा , आम्ही पाचोडला येत नसल्याची भूमिका घेतली . एकीकडे चार दिवस अगोदरच कुजलेले प्रेत त्यात आणखी चार दिवसाची भर असे मृतदेहास आठ दिवस उलटल्याने पोलिसांनी संयम राखत मयत जयसिग याचे वडील चकनेस चक्कु चव्हाण (वय - ४०) यांचे तक्रारीवरून अखेर खादगाव येथील दिलीप डाके , भैय्या डाके , पप्पु डाके , वैभव डाके या चौघांविरुद्ध शनिवारी (ता.१०) रात्री खुन व अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून भैय्या डाके , पप्पु डाके , वैभव डाके या तिघाना चौकशीसाठी ताब्यात घेतले .रविवारी (ता.११) दुपारी जयसिंगच्या नातेवाईकाकडे औरंगाबाद येथे एफ आय आरची प्रत देऊन संशयीताना अटक केल्याची खात्री झाल्यानंतरच त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी पोलिसांच्या उपस्थितीत जयसिग चव्हाणवर सोनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . तब्बल आठ दिवसांनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्याची प्रथमच अशी दुर्दैवी घटना परिसरात घडली .
या प्रकरणाचा पुढील तपास पैठणचे उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल करीत आहे .संबंधीत अटक करण्यात आलेल्या संशयीत भैय्या डाके ,पप्पु डाके , वैभव डाके यांस पोलिसानी पैठणच्या न्यायलया समोर उभे केले असता न्यायलयाने त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .