विवाहबाह्य प्रेम प्रकरणातून प्रेयसी पूनम विक्रांत पाटील हिचा खून करुन तिला जाळून टाकणार्‍या आरोपी सचिन थळे यांस मुरुड पोलिसांनी अटक केली. मुरुड पोलीस ठाणे हद्दीत धनगरवाडी ते महलोर गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला नागशेट येथील जंगल भागात एका महिलेचा मृतदेह अर्धवट स्थितीत जळालेल्या स्थितीत सापडला होता. याची माहिती पोलीस पाटील पांडुरंग पानगळे यांनी मुरुड पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन गवारे हे घटनास्थळी पोहचून तातडीने तपासास सुरुवात केली. श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञांकडूनही तपास करण्यात आला. अधिक तपासाअंती मुरुड पोलिसांना मांडवा पोलीस हद्दीत एक महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास केला असता ती महिला हीच असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी मग वेळ न दवडता मांडवा येथील सचिन दिनेश थळे याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्यानेच हे कृत्य केल्याचे कबूल केले. मांडवा येथेच राहणार्‍या सचिनचे त्याच गावातील युवतीशी प्रेमसंबंध होते. काही कारणावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.आरोपीने मनात राग धरून तिला मुरुडला आणून जीवे ठार मारले.पुरावा नष्ठ करण्यासाठी जंगल भागात मयत महिलेच्या अंगावर लाकडे रचून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मुरुड पोलिसांनी याप्रकरणी सचिन थळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप विभागीय पोलीस अधिकारी जयदिश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन गवारे,मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू पाटील, एएसआय सचिन वाणी, सुरेश वाघमारे, सागर रोहेकर, विलास आंबेतकर, सागर रसाळ यांनी आरोपीला पकडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.