वैजापूर तालुक्यातील विरगाव परिसरात चार बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. हे बिबटे शेतकऱ्यांच्या शेळ्या वासरे तसेच पाळीव प्राण्यांना शिकार बनवत असून रात्री बे रात्री हमला करून पाळीव जनावरांवर हल्ला करत आहेत. सावखेडे गंगा व सिद्धापूर वाडी येथील पती-पत्नी मोटार सायकलवर जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. बिबट्याच्या मोकाट वावरामुळे शेतकरी शेतात मशागतीसाठी जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे संपूर्ण विरगाव परिसरात बिबट्यांची दहशत असून स्थानिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याविषयी वारंवार सांगून देखील कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. असा आरोप आमदार बोरणारे यांनी केला आहे. नागपूरहून आम्हाला कोणतेही आदेश नाहीत त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही असे वन कर्मचारी सांगून हात झटकत आहेत. त्यामुळे विरगाव परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दहशतमुक्त करण्याची मागणी आमदार प्रा. रमेश बोरणारे यांनी 24 ऑगस्ट रोजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.