मुंबई :- (दीपक परेराव)मराठा_आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल तसेच या उमेदवारांना तातडीने नियुक्त करण्यात येईल आणि उर्वरित ७०२ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तसेच विभागांमार्फत विशेष मोहीमही राबविण्यात येईल असे स्पष्ट केले. 

यासोबतच मराठा तरुणांना कौशल्य विकास करणाऱ्या सारथी संस्थेला आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सक्षम करण्यात येईल तसेच सारथी या संस्थेत नवनवीन कोर्सेस सुरू करण्यासाठी नवीन पदे भरणे, त्यासाठी लागणारे इतर मनुष्यबळ वाढवणे याकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही हेदेखील याप्रसंगी स्पष्ट केले. 

मराठा आरक्षण देण्याबाबत पुढील कार्यवाही करतानाच यापुढे मराठा तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्यासह मंत्री आणि सचिव सोमवार ते बुधवार दुपारी ४ ते ६ या वेळेत मंत्रालयात उपस्थित राहतील असेही या बैठकीत स्पष्ट केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपले जीवन वाहून घेणारे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष माजी आमदार कै.विनायक मेटे याना या बैठकीच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. 

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन मंत्री शंभूराज देसाई, विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार अर्जुन खोतकर, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, मा. आमदार नरेंद्र पाटील, मराठा मोर्चाचे आबासाहेब पाटील, मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी तसेच मराठा आरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या विविध संघटना आणि मराठा समन्वयक उपस्थित होते.