वैजापुरात गोमांस व वाहतूक करणाऱ्या वाहनासह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त 

 

वैजापूर :- शैलेंद्र खैरमोडे 

राज्यात बंदी असलेल्या गोमांसाची वाहतुक करणारे वाहन वैजापूर पोलिसांनी पकडले. गाडीमध्ये तीन टन वजनाचे व सहा लाख रुपये किमतीचे गोमांस आढळुन आले. पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचे वाहन व गोमांस असा नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करुन हस्तगत केला आहे. ही कारवाई २२ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उक्कडगाव वैजापूर रस्त्यावर खंडोबानगरजवळ करण्यात आली. महिंद्रा बोलेरो या गाडीतुन (क्रमांक एमएच १२ एफडी २४५६) या वाहनातुन गोमांसाची वाहतुक करत असतांना खंडोबानगरजवळ गाडीचे टायर नादुरुस्त झाल्याने लोक जमा झाले. त्यामुळे भितीपोटी गाडीच्या चालक व मालकाने पळ काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलिस नाईक योगेश झाल्टे, प्रशांत गिते ,गणेश पैठणकर, जमधडे, सिंघल, सुंदर्डे यांनी घटनास्थळी भेट दिली. जप्ती पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे करत आहेत