आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील अविनाश साबळे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पदक पटकावले.बीड जिल्ह्यातील मांडवा गावात अविनाश साबळे यांच्या पालकांचा बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.त्याच्या या यशाने देशाबरोबर गावाची मान उंचावली. आता याच कारणाने या गावाचा विशेष विकास करणार असल्याचे बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले.त्यानंतर ते बोलत होते. मांडवा गावातील महादेव मंदिरासमोर या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख अविनाशची आई वैशाली,भाऊ योगेश, उपविभागीय अधिकारी कुदळे,तहसीलदार विनोद गुंडमवार, सरपंच यांच्यासह अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले कि, गावामध्ये क्रीडा संकुल, खोखो साठी मैदान यासाठी लवकरच जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत कामे मार्गी लावणार आहोत. तसेच या संदर्भात राज्यपालांच्या बीड र्यात विशेष बाब म्हणून गावाला निधी देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी साबळे यांच्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली आणि घरी भेट दिली. यावेळी त्यांनी पानंद रस्त्याच्या निधीतून रस्ता करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना दिल्या.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अविनाशचे वडील मुकुंद साबळे म्हणाले कि, मुलाच्या कर्तृत्वामुळे मला सन्मान मिळाला, जिल्हाधिकारी यांनी, गावकऱ्यांनी माझा सन्मान केला याबद्दल मला अभिमान वाटतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या सत्कार समारंभ प्रसंगी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.