( रत्नागिरी )

शहरातील धनजीनाका येथे किरकोळ कारणातून राजीवडा येथील तरुणाला दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (९ जानेवारी रोजी ) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. हुसेन आणि सलमान अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मोहसिन नुरमहम्मद फणसोपकर (३९, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) याने तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, मोहसिनचा मोबाईल हरवल्याप्रकरणी तो शहर पोलिस ठाण्यात अर्ज देण्यासाठी गेला होता. अर्ज दिल्यानंतर तो घरी परतत असताना दुपारी २ वा. धनजीनाका येथे हुसेनने मोहसिनला थांबवून तू कुठचा?असे विचारले. त्यावर त्याने मी राजिवडा येथे राहणारा आहे, असे सांगितले. तेव्हा हुसेनने सलमानला हाक मारून दांडका आण रे, असे सांगितले. मोहसिनची कॉलर पकडून सलमानने आणलेला लोखंडी रॉड घेऊन मोहसिनच्या डाव्या पायाच्या पोटरीवर व दोन्ही पायांच्या मांडीवर मागच्या बाजूस मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.