शिरुर: रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील ढोकसांगवी ते निमगाव भोगी रोडगलतच्या कॅनॉलजवळ दि 25 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास दोन व्यक्ती संशयीतरीत्या हालचाल करत असल्याचे दिसुन आल्याने त्यांच्याकडे शेतक-यांनी चौकशी करत आजुबाजुला पहाणी केली असता काही अंतरावर एक पाण्याची मोटार पडलेली दिसली. त्यावेळी जमलेल्या शेतक-यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यापैकी एक इसम पळुन गेला. त्यामुळे ताब्यात असलेल्या घेवुन शेतकऱ्यांनी रांजणगाव MIDC पोलीसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी शेतकरी आनंदा भानुदास गोरडे (रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी फिर्याद दिल्याने आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

रांजणगाव MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी ज्ञानेश्वर नंदु भोसले (रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याकडे सखोल तपास केला असता त्याचा साथीदार सिध्दांत विलास वायदंडे (रा. वडनेर ब्रद्रुक, ता. पारनेर, जि.अ.नगर) हा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस नाईक राजेंद्र ढगे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांनी पळुन गेलेल्या आरोपीचा शोध घेवुन त्यास गुन्हयामध्ये अटक केल्यानंतर पोलीस अटकेत असणा-या दोन्ही आरोपींनी अशाच प्रकारचे आणखी विहिरीवरील मोटारची चोरी केली असल्याची कबुली दिली असुन त्यांच्याकडुन दोन मोटार जप्त करण्यात आलेल्या असुन त्यांचेविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, शिरुर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस नाईक अमित चव्हाण, राजेंद्र ढगे, पोलिस हवालदार विलास आंबेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक अमित चव्हाण आणि राजेंद्र ढगे हे करत आहेत.