शिरुर - दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. तब्बल ५०० वर्षानंतर प्रभू श्रीराम स्वगृही विराजमान होत आहेत, त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे आनंदाचे अभिमानाचे वातावरण असून या अविस्मरणीय कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व भारतीयांना देण्यासाठी अयोध्या न्यासाच्या वतीने गावोगावी अक्षतांचे निमंत्रण पाठवण्यात आले असल्याची माहिती श्री .राम संपर्क अभियान जिल्हा समिती सदस्य सुरेश पडोळे व तालुका संयोजक अजिंक्य तारु यांनी दिली . त्यांनी सांगितले की शिरुर शहरात देखील सकल हिंदू समाजाच्या वतीने या अक्षता कलशांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली, त्याच बरोबर तालुक्यात विविध गावांमध्ये या मिरवणुका होत आहेत . "श्रीराम संपर्क अभियानाच्या" माध्यमातून शिरूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये १ जानेवारी २०२४ ते १५ जानेवारी २०२४ न्यासाच्या वतीने पाठवण्यात आलेले अक्षदा निमंत्रण घरोघरी वाटण्याचे अभियान तालुकाभर राबवण्यात येणार आहे. त्यानंतर २२ जानेवारी २०२४ रोजी प्रत्येक गावांमधील मठ मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दुपारी १ वा नंतर प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मंदिरांमध्ये सामुहिक आरती व प्रसादाचे नियोजन करण्यात येत आहेत. या अभियानामध्ये हिंदुत्व विचारांच्या विविध व्यक्ती , संस्था, संघटना सामील झाल्या आहेत. प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत, त्यामुळे सर्वानी या अभियानात सामील होण्याचे आवाहन अभियानाचे सहसंयोजक परशुराम मचाले यांच्या वतीने करण्यात आले आहे.