बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड किती प्रमाणात झाली याची माहिती विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी सीईओ अजित पवार यांच्याकडून जाणून घेतली. जिल्ह्यात तुतीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून तुती वृक्ष लागवडीत धरू नका, उद्या काही जण ऊस लावतील आणि तेही वृक्षलागवडीत धरले जाईल, असे होता कामा नये, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी जि.प.च्या सीईओंना दिले. ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते.

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त महसूल विभाग व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विक्रमादित्य लॉन टेनिस कोर्ट उभारण्यात आले. याचा उद्घाटन समारंभ आज सकाळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते पार पडला. या उद्घाटन समारंभानंतर केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जि.प.चे सीईओ अजित पवार यांच्याकडून वृक्ष लागवडीची माहिती जाणून घेण्यात आली. कुठे कुठे वृक्ष लागवड करण्यात आली आणि कोणते झाडे लावण्यात आले हे केंद्रेकर यांनी जाणून घेतले. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये घरकुलाची काय परिस्थिती आहे, किती घरकुल पुर्ण झाले, किती घरकुलांची कामे प्रलंबीत आहेत, याची माहिती सुद्धा जाणून घेण्यात आली. काही ठिकाणी बाजार तळाचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात येत आहे. ही माहिती देखील पवार यांनी विभागीय आयुक्तांना दिली. सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांनी आपआपल्या कार्यालयाच्या अंतर्गत सुरू कामांची माहिती केंद्रेकरांना सादर केली. या बैठकीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, सीईओ अजित पवार, जिल्हा क्रीडाधिकारी सुहासिनी देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.