अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

"पैठण तालुक्यातील आडुळ बायपास वरील घटना"

पाचोड (विजय चिडे) भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने आडुळ ता.पैठण येथील बायपास वरील माऊली - श्री गणेशा लॉन्स जवळ दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना (दि.१) रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली असून रामेश्वर शिवाजी जाधव,(वय 25)रा.केकत जळगाव ता.पैठण असे अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर वरुन राम जाधव हा आपल्या दुचाकी क्रमांक( एम एम २० एफ एच ९२९१)वरुन केकत जळगाव येथे एक विवाह समारंभ असल्याने त्यांना त्या ठिकाणचे मंडप बांधण्याची सुपारी असल्यामुळे ते गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास येत होते. राम जाधव हे मागील सहा ते सात महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या कुटुंबासह राहण्या साठी गेले होते. त्या ठिकाणी ते मिळते काम करून आपले कुटुंबाचा संसाराचा गाडा चालवत होते.त्याच बरोबर त्यांचे मूळगावी केकत जळगाव येथे मंडप व्यवसाय असल्याने त्यामध्ये देखील ते हातभार लावत होते. आज गावी मंडपासाठी सुपारी असल्याने ते येत असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ बायपास वरील श्रीगणेशा व माऊली या लॉन्स जवळ अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. 

या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ भोकरवाडी येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेला कळविले असता रुग्णवाहिके वरील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून जखमीला रुग्णालयात तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ बाबासाहेब घुगे यांनी रामेश्वर जाधव यास तपासून मृत घोषित करून त्यांच्यावर उत्तरीय तपासणी केली. या अपघातांची नोंद पाचोड पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जग्गन्नाथ उबाळे हे करीत आहेत.