अंगठेबहाद्दर शेतकऱ्यांची मुलगी झाली पोलिस कॉन्स्टेबल 

"माधुरी चिडे गावातून पहिली महिला पोलिस होण्याचा पटकावला बहुमान"

पाचोड (विजय चिडे) एखाद्या व्यक्तीने ध्येय निश्चित केल्यास तो परिस्थितीवर मात करु शकतो. आपण उच्च शिक्षित नसलो तरी मुलांना मात्र उच्च शिक्षण द्यायचेच, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुरम्यातील एका शेतकऱ्यांने आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले. विशेष म्हणजे कष्टातून आपल्या मुलीला गावातून पहिली महिला पोलिस कॉन्स्टेबल केले आहे.

नुकत्याच झालेल्या पोलिस भरती निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये मुरमा ता.पैठण येथील कैलास चिडे यांची मुलगी माधुरी कैलास चिडे हीने आई-वडीलांचे कष्ट लक्षात घेवून जिद्द, चिकाटीने अभ्यास करुन आपल्या अंगावर खाकी मिळवली आहे.माधुरीला मुळात वाचनाची आवड असलेल्या तीचे प्राथमिक शिक्षण हे मुरमा (ता. पैठण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण हे पाचोड येथील जवाहर कनिष्ठ महाविद्यालयात झाले तर पदवीधर शिक्षण शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड येथे झाले आहे.

माधुरीचे आई व वडील दोघेही अंगठेबहाद्दर असून ते अल्पभूधारक शेतकरी आहे.माधुरीला दोन मोठ्या बहीणी तर एक लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे. तिला लहान पणा पासूनच पोलिस व्हायचे होते; परंतु या क्षेत्राबाबत ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. महाविद्यालयातील मित्र मैत्रिणींच्या सर्कलमधून पोलिस प्रशिक्षणाची माहिती तिने मिळविली. सुरवातीला आई-वडिलांचा मात्र माधुरीच्या पोलिस होण्याला विरोध होता. यावेळी तीच्या दोन्ही बहीणी आई-वडिलांना तिला पोलिस भरती साठी तयारी करु द्या असे म्हटले, तेव्हा आईने व वडीलांनीतीला छत्रपती संभाजीनगरच्या गरुडझेप ऍकॅडमीत प्रवेश नोंदविला. त्या ठिकाणी तीने पोलिस होण्यासाठी शारीरिक कसरत करू लागली ती दररोज सकाळी व सायंकाळी शारिरीक कसरत करायची तर दुपारच्या वेळात अभ्यास असा तिचा दिनक्रम चालू होता. १३ जानेवारी नवी मुंबई तिची शारीरिक क्षमता चाचणी, तर २एप्रिलला लेखी परीक्षा झाली. या परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन करीत पोलिस कॉन्स्टेबल पदावर शिक्कामोर्तब केले. सुरवातीला विरोध करणाऱ्या आई-वडिलांना पोरगी पोलिस झाल्याचे कळताच त्यांचा ऊर भरून आला; परंतु केवळ पोलिस कॉन्स्टेबल पदावर माधुरी खूष नाही. तिला स्पर्धा परीक्षा देऊन पोलिस अधिकारी व्हायचे आहे असे म्हटले आहे.या यशाबद्दल तीचे गावात कौतुक केले जात आहे.

चौकट-पोलिस अधिकारी व्हायचे माझे स्वप्न होते‌. कुठल्याही परिस्थितीत ते पूर्ण करण्याचा माझा संकल्प केला होता. कोणतेही यश मिळविण्यासाठी त्याचा पाठलाग केला पाहिजे. त्यासाठी स्वत-ला झोकून देऊन अभ्यास केला पाहिजे. पोलीस होण्यासाठी घरातील सर्वांचे मोठे सहकार्य लाभले त्यामुळे मी आज पोलीस कॉन्स्टेबल झाले. मी इथेच शांत बसणार नाही तर यापुढे मी अभ्यास चालू ठेवून मोठ्या पदावर जाण्याची इच्छा माझ्या मनात आहे.

माधुरी चिडे,नवी मुंबई, पोलिस.