मानव विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर पुन्हा गुन्हा दाखल

सणसवाडीत कंपनीची तक्रार करत मागितली ठेका रुपात खंडणी

( शिक्रापूर प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथील कंपनीला मानव विकास परिषदेचे लेटरहेड देत नंतर एचआर मॅनेजरला धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर यांच्या विरुद्ध पुन्हा खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

                                   सणसवाडी ता. शिरुर येथील क्रोमवेल इंजिनिअरिंग कंपनीत मध्ये सहा फेब्रुवारी रोजी मानव विकास परिषदेचे लेटर पाठवून कंपनीच्या बांधकामाच्या परवानग्याची माहिती द्या अन्यथा कंपनीच्या विरोधात आंदोलन करु असा इशारा दिला त्यानंतर सदर संघटनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर याने कंपनीचे एच आर मॅनेजर प्रवीण बडदे यांना भेटून कंपनीत ठेका द्या नाहीतर महिन्याला पंधरा हजार रुपये द्या मग मी माघार घेतो असे म्हणत खंडणी मागितली होती याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होत निलेश दरेकर याला अटक करण्यात आली, दरम्यान पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी कोणाला अशा प्रकारे त्रास दिला असल्यास तक्रार देण्याचे आवाहन केले असता क्राफ्टस्मन ऑटोमेशन लिमिटेड कंपनीमध्ये देखील मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांच्या सांगण्यावरुन पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश दरेकर याने लेटर देत माहिती मागून नंतर कंपनीचे एच आर मॅनेजर महेश खन्ना व इतरांना भेटून कंपनीत दिलेले कामाचे कोटेशन मंजूर करा अन्यथा तुमची कंपनी कशी चालते हे पाहतो असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करुन धमकी देत ठेक्याच्या स्वरुपात खंडणी मागितली, याबाबत ईराज तिरंदास फरीदाणी रा. खराडी पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे या दोघांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस नाईक अतुल पखाले हे करत आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही कंपनी अथवा कंत्राटदारांना कोणी धमकावून खंडणी मागत असेल तर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार द्यावी अथवा ९०७७१००१०० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे.