लोकसभा, विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ निश्चित वाढणार - शिवराज पाटील चाकूरकर
युवक काँग्रेसच्या माझा गाव माझी शाखा अभियानांतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास मोठा प्रतिसाद
उमरगा-काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेला देशभरातील महिला, पुरुष व युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत झाले असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संसद व राज्याराज्यात काँग्रेसचे संख्याबळ निश्चित वाढेल असा विश्वास देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या वतीने उमरगा येथे मंगळवारी (दि. 7) माझा गाव माझी शाखा या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उदघाटन सत्रात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, महासचिव कोकोजी, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावेरू, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मितेंद्र सिंग, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, उपाध्यक्ष प्रशांत ओगले, शिवराज मोरे, अभिजित चव्हाण, अविनाश मोरे, सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सचिव महेश पाटील, सरचिटणीस दीपाली ससाणे, श्री. याज्ञवल्क्य जिचकार, सहप्रभारी प्रदीप सिंघल, योगेश राठोड, भैय्या निरफळ, तनया कडगांचे, संगीताताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या स्थापनेनंतर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आताचे खासदार राहूल गांधी यांच्यापर्यंत कोणीही केवळ निवडणुकीपूरते काम केले नाही. सतत देशाचा आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार काँग्रेसने केला आहे. देश मजबुत बनवायचा असेल तर आर्थिक, सामाजिक दरी कमी करून लोकशाही मजबूत झाली पाहिजे. हा विचार घेऊनच काढलेल्या भारत जोडो यात्रेत युवकांना देशाच्या सर्वच भागाची सांस्कृतिक ओळख झाली. त्यामुळे काँगेस पक्षाचे संघटन देखील मजबूत झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसने माझा गाव माझी शाखा अभियानांतर्गत गावागावात काँग्रेसची सक्षम फळी निर्माण केल्यामुळे पक्षाला आगामी काळात चांगले भवितव्य असल्याचेही ते म्हणाले.
प्रस्ताविकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील म्हणाले की, सन 2024 च्या निवडणुकीत देशात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेने देशभरात झंझावात निर्माण झाला असून युवकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. याचा आगामी लोकसभा व विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचे सांगून प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून युवकांनी आपापल्या गावात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी एकदिलाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेसमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी - श्रीनिवास
काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. काँग्रेस पक्षात नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो. देशातील राजकिय स्थिती पाहता काँग्रेस पक्षाने आपली ताकद वाढवून सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी माझा गाव माझी शाखा अभियानाअंतर्गत कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पक्षाची ताकद अधिक मजबुत करावी असे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी केले.
कार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, महालिंग बाबशेट्टी यांच्यासह उमरगा, लोहारा, तालुक्यातील काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकच परिवर्तन घडवू शकतो - नानासाहेब पाटील
कुठल्याही विचाराने प्रेरित झालेला
युवकच परिवर्तन घडवू शकतो. आपला देश खेड्यात वसलेला आहे. त्यामुळे गावोगावी काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी युवकांनी गाव तिथे शाखा स्थापन करून पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्याचे काम करावे. असे आवाहन उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी केले.
प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना कानमंत्र-
माझा गाव माझी शाखा अभियानांतर्गत प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या सत्रात शाखाप्रमुख व कार्यकर्त्यांना गाव पातळीवर कशा पद्धतीने काम करावे, पक्षाची ध्येयधोरणे, विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक बूथ स्तरावर कार्यक्रम राबवावा. गाव पातळीवरील समस्या सोडवून जनतेच्या मनात काँग्रेसचा विचार रुजविण्याचे काम करावे. तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. कार्यकर्ता हाच पक्षाचा कणा आहे. म्हणून काँग्रेस पक्षात कार्यकर्त्याला नेहमीच सन्मानाची वागणूक दिली जात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
• उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांचे कौतुक-
माझा गाव माझी शाखा अभियान गावागावात प्रभावीपणे राबवून पक्षाचे संघटन मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यासाठी भव्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याबद्दल सर्वच पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांचे आपल्या भाषणात कौतुक केले.