फसल बिमा सप्ताह उपक्रमाच्या प्रचार प्रसिद्धी रथाचा प्रारंभ

तळेगाव ढमढेरे प्रतिनिधी:

भारतीय कृषी विमा कंपनी व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने फसल बिमा सप्ताह चे तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावोगावी उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

शिरूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे भारतीय कृषी विमा कंपनीच्या फसल बिमा सप्ताह उपक्रमाच्या प्रचार प्रसिद्धी रथाचा प्रारंभ कृषी अधिकारी सतीश केलगंद्रे, कृषी पर्यवेक्षक संभाजी वाकचौरे, सी.ए. चौरे तसेच शिरूर तालुका समन्वयक आकाश वडघुले यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी बांधवांना पिक विमा योजने विषयी जनजागृती व्हावी म्हणून कृषी विभाग महाराष्ट्र शासन व भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या माध्यमातून पीक विमा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. शिरूर तालुक्यातील न्हावरा, निमोणे, शिरूर, आण्णापुर,टाकळी हाजी, मलठण, पाबळ या मोठ्या गावांना भेट देऊन विमा सप्ताहाचा प्रचार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

आंबिया बहार सन २०२२ मधील डाळिंब या फळ पिकासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ आहे तर आंबा या फळ पिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ अशी आहे. तरी सर्व इच्छुक शेतकरी बांधवानी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय कृषी विमा कंपनी कडून शेतकरी बांधवाना करण्यात आले आहे.