26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दरम्यान सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात आले. सामाजिक न्याय पर्वाचा समारोपीय कार्यक्रम आज 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, ॲड. अभिमन्यू नवघरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ व प्राचार्य यु.एस. जमदाडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करुन अभिवादन केले.
ॲड. नवघरे यांनी आपल्या मार्गदर्शनात दिव्यांग व्यक्तीचे अधिकार व नालसा योजना 2016 (ॲसिड अटॅक) अंतर्गत दिव्यांगासाठी व पीडीतांसाठी विशेष शाळा, शिष्यवृत्ती, व्यवसायाकरीता प्रशिक्षण व अर्थसहाय्य, कृत्रिम अवयव, व नोकरीत आरक्षण याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्र विक्टींम कॉम्पनसेशन स्कीम, मनोधैर्य योजना व नालसा योजनेअंतर्गत असलेल्या अर्थसहाय्याची माहिती दिली व पीडीतांना मदत करण्याचे आवाहन केले. श्री. टेकवाणी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे समाजाभिमुख आहे. त्यांनी समाजामध्ये समानता, बंधुता व एकात्मता स्थापित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. शोषित व वंचित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणून त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी त्यांनी भारताला एक उत्कृष्ट संविधान दिले. त्यामुळे आपल्या देशामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध झाली आहे असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य श्री. जमदाडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेतल्यामुळे सर्वांना शिक्षणाच्या संधी प्राप्त झाल्या. संविधानामध्ये शिक्षणाचा समावेश मूलभूत अधिकारात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय मार्गदर्शनातून डॉ. श्रीमती कुलाल म्हणाल्या, ज्या समाजातील महिला प्रगतीशील आहे तो समाज प्रगत आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती होणार नाही यासाठी बाबासाहेबांनी महिलांच्या उन्नती व प्रगतीसाठी संविधानामध्ये विविध प्रकारच्या तरतूदी केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.प्रास्ताविकातून श्री. वाठ यांनी 26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या दरम्यान आयोजित सामाजिक न्याय पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती देवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व शोषीत व वंचीत घटकांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विधी अधिकारी के. पी. राऊत, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती ए. ए. राऊत, देवानंद लकडे, गृहपाल एस. एस. इंगोले, समाज कल्याण निरीक्षक ए. बी. चव्हाण, एस. एम. निमन, विजय भगत, आर. टी. चव्हाण, पी. ए. गवळी, जी. एम. उगले, एन. जे. चव्हाण, जिल्हयातील विविध वसतीगृहाचे गृहपाल, निवासी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. गजानन हिवसे यांनी केले. आभार समाज कल्याण निरीक्षक संध्या राठोड यांनी मानले.