रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सागरी सीमा मंच, पर्यावरण गतिविधी व प्रशासन सहकारी संस्थांनी आयोजित केलेल्या स्वच्छ सागर तट अभियानात सहभागी संस्थांचा सन्मान सोहळा झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात रंगला. या कार्यक्रमाला सीमा जागरण मंचाचे अखिल भारतीय संयोजक ए. गोपाळ कृष्णन, सागरी सीमा मंचाचे प्रांत संयोजक संतोष पावरी, सहसंयोजक संतोष सुर्वे, सागरी सीमा मंचाचे प्रांत संघटन मंत्री अनिकेत कोंडाजी, रत्नागिरी विभाग संयोजक मयुरेश पाटणकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्निल सावंत, महिला संघटक तनया शिवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अविनाश काळे, तनया शिवलकर, शिक्षिका संध्या शितोळे, राजू भाटलेकर आदींनी मनोगतामधून सागरी स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सागरी सीमा मंचाच्या कार्यात यापुढे अधिक जोमाने मदत करू अशी ग्वाही दिली. स्वप्नील सावंत यांनी सागर तट स्वच्छता अभियानाचा आढावा सादर केला. सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यापुढेही अशा प्रकारचे अभियान राबवण्यात येणार आहे. किनारपट्टी भागात सागरी सीमा मंचाचे काम अधिक जोमाने करायचे असून त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात जयगड ते जैतापूर (माडबन) पर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नांदीवडे, मालगुंड, गणपतीपुळे, आरे, काळबादेवी, मिर्‍या, पांढरा समुद्र, मांडवी, भाट्ये, कसोप, कुर्ली, वायंगणी, रनपार बीच, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, वेत्ये, आंबोळगड, जैतापूर, साखरी नाट्ये येथे स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, महिला बचत गट, तसेच व्यक्तींचा सन्माचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन ए. गोपाळ कृष्णन व संतोष सुर्वे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात साईजित शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. मयुरेश पाटणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिकेत कोंडाजी यांनी गीत सादर केले. संतोष पावरी यांनी आभार मानले.