राजापूर : तालुक्यातील बारसू रिफायनरीचा वाद आता वेगळं वेगळं रुप धारण करत आहे. काही महिन्या पूर्वी रिफायनरीचा वाद फक्त शासन, प्रशासन आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये धुमसत होता. परंतु आता तो राजकीय पटलावर गेला असून उद्भव ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची बारसू 'रिफायनरी' प्रकल्पावरुन जुंपल्याचे दिसून येत आहे.

'रिफायनरी' साठी कुणाच्या किती कुणासोबत बैठका झाल्या हे सांगायला लावू नका असे ना. उदय सामंत यांनी खा. राऊत यांना का सुनावले? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. ना. उदय सामंत हे बारसू सोलगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रिफायनरी प्रकल्पाची गेल्या वर्षभरापासून भलामण करत आहेत. पूर्ण प्रशासनच त्यांनी दावणीला बांधले आहे. असा आरोपही बारसू- सोलगाव पंचक्रोशीने वेळोवेळी केला आहे. तसेच राजापूर तालुक्यातील काही मोजकेच उदय सामंत समर्थक ही सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान काल मंगळवार दि. २९ रोजी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत खा. विनायक राऊत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर रिफायनरी प्रकल्पा वरुन घणाघात करत त्यांनी बारसू- गोवळ परिसरातील परप्रांतीयांनी घेतलेल्या जमिनीची यादीच वाचून दाखवत उद्योग मंत्री उदय सामंत हे केवळ परप्रांतीय गुंतवणूकदारांच्या तुंबड्या भरण्यासाठीच रिफायनरी प्रकल्पाचा पुढाकार घेत आहेत, असा आरोप केला होता. तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत हे निवेदने देऊनही आंदोलकांच्या प्रतिनिधीना भेट देत नाहीत असा आरोपही केला होता.यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया देताना रिफायनरीबाबत कुणाच्या किती कुणासोबत बैठका झाल्या हे सांगायला लावू नका असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे कोकणवासीयांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जानेवारी २०२२ मध्ये रिफायनरीसाठी जागा मिळवून देण्यासाठी केंद्राला पत्र लिहिण्यास कुणी सांगितले? त्यावेळी उध्दवजीचे मन वळविण्यासाठी कोण आमदार, खासदार व मंत्री प्रयत्न करत होते? उध्दवजीना बारसू - सोलगाव पंचक्रोशीतील स्थानिकांचे आंदोलन उभे राहणार नाही असे कुणी सांगितले. रिफायनरी कंपनीकडून पक्षाला आणि नेत्यांना काय मलिदा प्राप्त होईल याची बोलणी कुणी केली, पहिला हफ्ता कुठे आणि कुणी पोहचवला ? अशी माहितीही आता पुढे येत आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीसाठी केंद्राला पाठविण्यात आलेल्या 'त्या' पत्राला आता आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा 'वास' येत आहे.

दरम्यान खा. राऊत आणि ना. सामंत यांच्या वाकयुध्दात याची पहिली ठिणगी पडलीच आहे. ना. उदय सामंत दररोज रिफायनरी संदर्भात भरभरुन बोलतात तर त्यांनी आता शिवसेना आणि उध्दवजींनी रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका का व कशी घेतली, त्याचा घटनाक्रम काय, हे एकदाचे जाहीर करावे. कोकणवासीय देखील त्याची वाटच पाहत आहेत. नाही तर 'रिफायनरी' साठी कुणाच्या किती कुणासोबत बैठका झाल्या हे सांगायला लावू नका अशा पोकळ धमक्या ना. उदय सामंत यांनी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला देऊ नका असे बारसू - सोलगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.