रत्नागिरी,( वा.) शहरातील पऱ्यांची आळी येथे तीन ते चार तरुणांनी एका तरुणाच्या डोक्यात लादी घालून धारदार कोयत्याने त्याच्या डोके व हातावर वार केले. बुधवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी झालेल्या नागेश प्रकाश गजबार (वय २७ रा. कुवारबाव) या तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु भर बाजारपेठेत हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे राहणाऱ्या नागेशला काही तरुणांनी फोन करून शहरातील पऱ्याचीआळी येथे बोलावले. तीन ते चार तरुण त्याच्या ओळखीचेच होते, परंतु नागेश पाऱ्याची आळी येथे आल्यानंतर त्यातील एका तरुणाने त्याच्या डोक्यात लादी घातली. त्यानंतर दुसऱ्या तरुणाने धारदार कोयत्याने नागेशच्या डोक्यावर, हातावर सपासप वार केले. त्यानंतर ते तरुण घटनास्थळावरून पळून गेले. स्थानिक नागरिकांनी नागेशला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेत आलेल्या नागेशवर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते. या घटनेची माहिती मिळतात प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासह घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, परंतु हल्लेखोर अद्यापही शहर पोलिसांना सापडलेले नाहीत.