मंचर: आंबेगाव तालुक्यात ७० गावातील गायरान क्षेत्रातील 3 हजार २६७ अतिक्रमणधारक घर मालकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या प्रशासकीय कारवाईला वेग आला आहे. देवगाव हे गावच अन्य ठिकाणी स्थलांतरीत करावे लागेल. अशी परस्थिती आहे. नोटीसा आल्याने अतिक्रमण धारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अतिक्रमण धारकांच्या विरोधात कारवाई झाल्यास गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर येतील. गरीब कुटुंबाना न्याय मिळवून देण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घ्यावा." अशी मागणी इंदिरानगर, निघोटवाडी येथील कुटुंबांनी वळसे पाटील यांना भेटून केली. येथील २७२ कुटुंबाना अतिक्रमण पाडून टाकण्याबाबत प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. येथे बीड, मराठवाडा भागातुन स्थलांतरित झालेल्या भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबांची घरे आहेत.
"गायरान जागेतील अतिक्रमण हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता.त्यानंतर उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत अतिक्रमण काढण्यासाठी आदेश दिले आहेत. या संदर्भात तातडीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे दिलीप वळसे पाटील यांनी संपर्क साधून चर्चा केली. "राज्य शासन नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही.सरकार योग्य तो निर्णय घेईल." अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. यावेळी अतिक्रमण धारकांच्या समवेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे, राष्ट्रवादीचे मंचर शहराध्यक्ष सुहास बाणखेले, प्रमोद बाणखेले, राजू जाधव उपस्थित होते.
"हातावर पोट असणाऱ्या अनेक गरिबांची घरे गायरान जमिनीत आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाईत त्यांची घरे पाडून टाकल्यास त्यांचे संसार उघड्यावर पडतील. सध्या चिंतेत असलेल्या अतिक्रमण धारकांनी घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."
दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री.
"ज्या पद्धतीने शहरात गुंठेवारी किंवा अनधिकृत बांधकामांना अधिकृत करून दिले जाते. तसेच या गरीब लोकांना गायरान मधील अतिक्रमण नियमित करून द्यावीत"
विवेक वळसे पाटील,माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद
आंबेगाव तालुक्यात सर्वाधित अतिक्रमण धारक नोटीसा अवसरी बुद्रुक गावात ३५९ जणांना आहेत.अन्य गावांची नावे व नोटीस धारकांची संख्या :- निघोटवाडी- इंदिरानगर २७२, देवगाव २३०,चांडोली खुर्द `१८३, अवसरी खुर्द १७१, निरगुडसर १६९, धामणी १०३ , सुलतानपूर ३७, पेठ १९६