औरंगाबाद : राज्यातील गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आलेत. गोवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतानाच दिसतेय. रविवारी संशयित गोवर रुग्णांची संख्या 10 हजार 544 वर पोहोचलीय. सध्या गोवरची लागण झालेल्यांची संख्या 658 वर पोहोचली.  जगभरात तीन वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात पहिल्यांदा लॉकडाऊन लागलं. कोरोनाची लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले होते. वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं ही पावलं उचलली होती. सध्या राज्यभरात गोवरच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिलेत. गोवराची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना दिलेत. त्यासाठी रुग्णालयीन व्यवस्था करण्याचे निर्देशही टास्क फोर्सकडून देण्यात आलेत. कुपोषित बालकांना गोवराची लागण झाल्यास त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्व 'अ'चा डोस द्यावा, असेही निर्देश टास्क फोर्सने प्रशासनाला दिलेत