रत्नागिरी : कॅन्सरवर औषध बनवण्यासाठी फणस पानाचा अर्क वापरला जातो. फणस हा कल्पवृक्ष आहे. चारखंडाचे पशुखाद्य होते, आठीळमध्ये भरपूर प्रोटीन आहे. अनेक ठिकाणांहून लोक फणसबाग बघायला येतात. फणस लागवडीबाबत जागृती होत आहे. फणस लागवड अत्यल्प खर्चात होते. नंतर फवारणी, पाणी खर्च नाही. शिवाय आता पंधरा फूटपर्यंतच वाढणाऱ्या जाती असल्याने, लोकांनी फणस लागवड, फणस प्रक्रिया याकडे वळावे, फणस झाड कोकणाला समृद्ध बनवेल, असे प्रतिपादन फणसकिंग हरिश्चंद्र देसाई आणि सुपुत्र मिथिलेश देसाई यांनी केले. ते गोळप कट्टाच्या ३७ व्या कार्यक्रमात होते.
हरिश्चंद्र देसाई म्हणाले, माझा जन्म हातखंब्यात झाला, लहानपण तिथे गेले. परिस्थीमुळे हातखंबा तिठा येथे करवंदे, काजूगर, आंबे, चहा विकून शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी हातभार लावला. कष्टाच्या पैशांनी बीएस्सी झालो. एमआयडीसीत कोकण कॅप्सूलला नोकरी लागली. नंतर एक्सरे टेक्निशियनचा कॉल आला व शिरोड्यात हजर झालो. पूर्ण सिंधुदुर्ग फिरलो. ३२ वर्ष प्रामाणिकपणे नोकरी केली. १९९० ला लांज्यात बदली होऊन आलो. २००० साली पत्नीचे दागिने गहाण ठेऊन आठ एकर जमीन घेऊन काजू झाडे लावली. २०१४ ला दापोलीत फणस कार्यशाळेत माहिती घेतली व २०१५ ला केरळातून ४०० फणस कलमे आणून लावली. लोकांनी वेड्यात काढले पण दोन तीन वर्षात फणस धरायला लागल्यावर लोकांचे कुतूहल वाढले. निवृत्त झाल्यावर २७ एकरात ८६ प्रकारच्या आणि काप्या फणसाची लागवड केली. यावर २ ते ५० किलोचे फणस लागतात.
मिथिलेश देसाई म्हणाले, युपीएसस्सी करायचं डोक्यात होतं. मग राहुरी विद्यापीठात अँग्रीकल्चर इंजिनिअरिंग उत्तम गुणांनी केले. युपीएसस्सीची मेन्स परीक्षा दिली होती. गावी बाबा फणसाचे प्रयोग करत होते, त्यातून रुची वाढली. केरळला फणस प्रदर्शनात गेल्यावर ठरवलं की यापुढे युपीएसस्सी नाद सोडून फणस या विषयात काहीतरी करायचं. जुनी आणि नवी पिढीमध्ये वैचारिक मतभेद असतात, तसे आमच्याकडे नाहीत. याप्रसंगी गोळपसारख्या गावात अविनाश काळे दरमहिन्याला गोळप कट्टा आयोजित करून तरुणांना प्रेरणा देत असल्याबद्दल देसाई यांनी कौतुक केले.