रत्नागिरी :पालकमंत्री उदय सामंत यांच्या आजच्या धावत्या दौऱ्यातील एका गुप्त बैठकीने रत्नागिरीतील राजकीय वातावरण ढवळुण निघाले आहे. अचानक झालेल्या या बैठकीबाबत सर्वांचीच उत्सुकता ताणली असून पुन्हा राजकीय भूकंप होणार की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. आमदार राजन साळवी यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला असला तरी मोठ्या राजकीय उलथापालथीसारखे वातावरण होते.
राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊन शिवसेनत उभी फुट पडली. सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का दिला. कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी अनैसर्गिक आघाडी केल्याचा आरोप करीत त्यांनी ही फारकत घेतली. ४० आमदार आणि १२ खासदार घेऊन ते बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती करून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्या-त्या जिल्ह्यातील शिंदे गटाने पाय पसरायला सुरवात केली. यावरून ठाकरे आणि शिंदे सेनेत जारदार राजकीय संघर्ष दिसून आला. शिंदे गटाच्या संपर्कात येणाऱ्याची ठाकरे सेनेतुन हकालपट्टी करण्यात येऊ लागली. शिंदे गटाकडील इनकमिंग काहीसे थांबले. परंतु सत्तेचा शिंदे गटावरील विश्वास कायम असल्याने आणखी काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते. राजापूर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. परंतु याला आमदार राजन साळवी यांनी आपण कट्टर आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे सांगून पूर्णविराम दिला.
दरम्यान सोमवारी शिंदे गटाचे उपनेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यांच्या शासकीय बैठका झाल्यानंतर ते विश्रामगृहाकडे येणार होते. त्यांना भेटण्यासाठी अनेकांची गर्दी होती. बराच वेळ झाला तरी सामंत विश्रामगृहाकडे आले नाहीत. अनेकांच्या नजरा त्यांच्या वाटेवर होत्या. उशिर झाल्यामुळे अनेकांची चुळबुळ सुरू झाली. काहींनी सांगितले महत्त्वाच्या बैठकीसाठी ते गेले आहेत, यायला उशिर होणार आहे. तेव्हा काहींनी खोदून खोदून माहिती काढण्यास सुरवात केली. तेव्हा समजले की महत्त्वाची आणि मोठी राजकीय उलथापालत घडविणारी गुप्त बैठक सामंत यांनी घेतली. विश्रामगृहाकडे परत न येता बैठकीच्या ठिकाणाहूनच ते हेलिकॉफ्टरने मुंबईला रवाना झाले. विशेष म्हणजे रत्नागिरीत राजकीय भूकंप घडविणारी ही बैठक आहे. मात्र त्याबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे.