संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे १७ नोव्हेबरला रत्नागिरीहून बेळगावकडे जाणाऱ्या बसला आंबा घाटाच्या पायथ्याशी अपघात झाला. बस उलटून अचानक बसने पेट घेतला. बसमधील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात होता. सर्वांच्याच समोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान त्याच मार्गावरून रत्नागिरीकडे जाणाऱ्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या इंदापूर (पुणे) व नळदुर्ग ( उस्मानाबाद) येथील रुग्णवाहिका देवदूताप्रमाणे मदतीसाठी धावून आल्या. चालकांनी कर्तव्यदक्षता दाखवीत सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. त्यांच्या या कार्याचा गौरव रत्नागिरी येथील आरटीओ कार्यालयाने केला.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

अपघाताची कोणतीही पूर्व सूचना नाही तसेच चालकांसाठी हे ठिकाण सुद्धा नवीन होते तरीही अशा कठीण परिस्थितीत प्रसंगावधान राखत चालकांनी स्थानिकांच्या व पोलिसांच्या मदतीने सर्व प्रवाशांना तातडीने बस मधून बाहेर काढत साखरपा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. या वेगळ्या कार्याबद्दल संस्थानाच्या रुग्णवाहिकांचे चालक रमेश जाधव, सुनील भोळे व नाशिक कसारा घाट येथील चालक निवृत्ती गुंड, हातखंबाचे चालक धनेश केतकर यांच्या चांगल्या कामाबाबत रत्नागिरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ मार्फत सत्कार करण्यात आला. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना ताम्हणकर म्हणाले, “जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे चालक अतिशय प्रामाणिकपणे महामार्गावर काम करत आहेत. अपघात झाला की रुग्णवाहिका चालक तातडीने घटनास्थळी दाखल होतात. संबंधित रुग्णाना इस्पितळात दाखल करतात. अपघात झाल्यानंतरची सुरुवातीची पाच ते दहा मिनिटे महत्वाची असतात. लवकरात लवकर त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे असते, तरच त्याचा जीव वाचू शकतो. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे चालक अतिशय सेवाभावी वृत्तीने व जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणे काम करत आहेत. त्याचा आपल्याला अभिमान आहे." अंजणारी येथे काही दिवसापूर्वी केमिकलचा टँकर नदीत कोसळला होता. याप्रसंगी हातखंबा येथील चालक धनेश केतकर यांनी नदीमध्ये उतरून चालकाचा मृतदेह बाहेर काढला होता, त्याचेही कौतुक अजित ताम्हणकर यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले, “सेवा करण्यासाठी एक मनाची तयारी असावी लागते. ती मनाची तयारी या चालकांकडे आहे. काल साखरपा येथे जो अपघात झाला त्यावेळी चालकाने तत्परता दाखवली, ती वाखाणण्या जोगी आहे. यापुढे आरटीओ कार्यालयातून संस्थानच्या उपक्रमांना नेहमी सहकार्य राहील. "

याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक सुदेश कुंदकुर्तीकर, प्रसाद सानप, मोटार वाहन निरीक्षक सोयल ओहाळ, धनराज नायकवडे, मोहसीन आवटी, निखिल पुजारी, संकेत सोमनाचे, अमोल कदम आदी उपस्थित होते. संस्थांतर्फे राजन बोडेकर यांनी चालकांच्या सत्काराबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला आरटीओ कार्यालयातील कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.