अहमदनगर: नगर औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे पाच वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात सात जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद रोडवरील पांढरीपूल येथील अमित बेकर्स समोर नगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकने ( क्र. एम.पी. २० एच.बी. ५३४०) पुढे चाललेल्या पुणे- कळमनुरी एस.टी. बसला (क्र. एम.एच.२० बी. एल. ३५८४) जोराची धडक दिली.
धडक इतक्या जोराची होती की एसटीची पाठीमागील बाजू पूर्णपणे तुटली आहे. एसटी मधील प्रवासी जखमी झाले. एसटीला पाठीमागून धडक दिल्याने एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व पुढे चाललेल्या टाटा हारेर (क्र. एम. एच.१७ सी. आर. ३९६३) गाडीला एसटीने टक्कर दिली तर टाटा हारेर वाहनाने समोरील टाटा इंट्रा (क्र.एम.एच.१६ सी.डी. २६७८) या मालवाहतूक गाडीस धडक दिली. टाटा इंट्रा गाडी ही मध्यान्ह भोजन योजनेची होती.
टाटा इंट्रा गाडी रस्त्यावर पलटी झाली या गाडीतील दोघेजण जखमी झाले आहेत. तसेच एसटी बस खाली रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी आल्याने तिचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातात एकूण सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील विविध रुग्णालयांनी उपचार सुरु आहेत. अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.