शिरुर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या पतीसह तिघांवर गुन्हे
( शिक्रापूर प्रतिनिधी ) गणेगाव खालसा ता. शिरुर येथील दोन महिलांच्या जमिनीतील मुरुमाची महिलेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांचे पती उद्योजक प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड, हेमंत ढमढेरे, प्रवीण दंडवते यांच्या विरुद्ध मुरूम चोरी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गणेगाव खालसा ता. शिरुर येथे राजश्री मोरे व नंदाबाई साळवे यांची जमीन गट असून २०२० मध्ये सदर जमिनीत मुरूम उत्खनन केल्या प्रकरणी शिरुर तहसील कार्यालय येथे नोटीस लावत राजश्री मोरे व नंदाबाई साळवे यांना सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये दंड का आकारण्यात येऊ नये असे नोटीस लावले होते त्यामुळे राजश्री मोरे यांनी त्याबाबत त्यांचे म्हणणे तहसीलदार यांच्याकडे मांडत या जागेतील मुरूम हा प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड, हेमंत ढमढेरे, प्रवीण दंडवते यांनी उत्खनन केला असल्याचे सांगितले होते, त्यांनतर तहसीलदार यांनी सदर जागेतील मुरूम उत्खनन बाबत राजश्री मोरे व नंदाबाई साळवे यांना सव्वीस लाख बहात्तर हजार रुपये दंड भरण्याबाबतचे आदेश दिले असता राजश्री मोरे यांनी त्याविरोधात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांच्याकडे अर्ज दिला असता सदर आयोगाने त्याबाबतचा अहवाल तहसीलदार यांच्याकडून घेत घडलेल्या प्रकारात अहवालानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यांनतर याबाबत राजश्री अंकुश मोरे वय ४२ वर्षे रा. न्हावरा रा. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांचे पती उद्योजक प्रमोद पऱ्हाड, महेंद्र पऱ्हाड दोघे रा. केंदूर ता. शिरुर जि. पुणे, हेमंत ढमढेरे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे सध्या रा. खराडी बायपास चंदननगर पुणे व प्रवीण दंडवते रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.