मुंबई: शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीमध्ये अल्पावधीतच मोठं स्थान प्राप्त झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या बातम्या सुरु झाल्या आहेत. पक्षाच्या व्यासपीठावरही ते फारसे दिसेनासे झाले आहेत. अशातच आता अमोल कोल्हे यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अमोल कोल्हे यांच नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून गायब झाल आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. या स्टार प्रचारकांच्या यादीमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अमोल कोल्हे यांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून गायब झालंय. त्यामुळे कोल्हे आणि राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरु आहे? याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबीर पार पडलं होतं, या कार्यक्रमाला कोल्हे उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती. प्रकृती अस्वस्थ्याचं कारण त्यांनी यावेळी दिलं होतं. मात्र महाराष्ट्रात प्रचाराची धुरा सांभाळणारे कोल्हेच प्रचारकांच्या यादीतून गायब झाल्यानं आता नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.