चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाची गती वाढणार आहे. चिपळूण हद्दीतील कामाला अडथळा ठरणारी ९० टक्के अतिक्रमणे हटविल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, प्रशासन आणि ठेकेदार कंपनी यांनी उर्वरीत अतिक्रमणेही हटविण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यानुसार परशुराम घाट ते कापसाळ दरम्यानच्या महामार्गावरील दोन्ही बाजूची शिल्लक असलेली अतिक्रमणे गुरूवार दि. १७ नोव्हेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गेली अनेक वर्षे चिपळुणातील सुमारे ३५ कि.मी. अंतराच्या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. परशुराम घाट ते आरवली दरम्यान अनेक कारणांनी वाद उदभवून चौपदरीकरणाचे काम वारंवार ठप्प होत आहे. प्रामुख्याने परशुराम घाट परिसरात जागेसंदर्भातील वाद, नैसर्गिक आपत्ती, वाहनांची वर्दळ आदी कारणांनी तर शहरात वाहनांची वर्दळ, जागेचा वाद, कामाच्या दर्जाबाबत तक्रारी तसेच कामाच्या तांत्रिक नियोजनाबाबत शहरातील नागरिक व महामार्ग विभाग अधिकारी यांच्यातील मतभेद अशा विविध कारणांनी चौपदरीकरणाची कामे रखडून गती मंदावली आहे. त्याचबरोबर काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्या देखील बदलत आहेत. ठेकेदार बदलला तरी कामाचा दर्जाही सुमारच राहिलेला आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचणे व तडे जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच मे अखेर संपूर्ण चौपदरीकरणाचे काम पूर्ण व्हावे, या उद्देशाने परशुराम घाट ते कापसाळ दरम्यानचा सुमारे दहा कि.मी. मार्गावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे हटविण्याचे काम संबंधित ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून प्रशासनाच्या सहकार्याने केले जाणार आहे. सोमवारपासून हे काम सुरु होणार होते. मात्र मंगळवारी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे खेड दौऱ्यावर आले होते. तिथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला. त्यामुळे गुरुवार दि. १७ पासून ही मोहीम सुरु केली जाणार आहे. महामार्गालगत संपादीत केलेल्या जागेवर असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत महसूल विभाग, पोलीस यंत्रणा, राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.