शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा माजी उपसरपंच जेरबंद
वाडा पुनर्वसनचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळीला अटक
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे मित्राची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी हा शिक्रापूर पोलिसांना तब्बल सहा महिने गुंगारा देत होता मात्र शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली आहे.
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील बाळासाहेब लांडे यांचा मित्र असलेला वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी याने काही दिवसांपूर्वी लांडे यांच्या घरी येऊन काही कामानिमित्त बाळासाहेब लांडे यांची एम एच १२ एच के ६६७७ की स्कोर्पिओ कार नेली होती, त्यांनतर अनेक दिवस उलटून देखील सचिन माळी हा स्कोर्पिओ घेऊन आला नाही, त्यानंतर सचिन माळी हा वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने बाळासाहेब राजाराम लांडे वय ४१ रा. लांडेवस्ती तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन सीताराम माळी रा. वाडा पुनर्वसन ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध मे २०२२ मध्ये गुन्हे दाखल केले होते मात्र गुन्हे दाखल झाल्यापासून माळी हा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर काल सायंकाळच्या सुमारास सचिन माळी हा कोरेगाव भीमा परिसरात येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस शिपाई भास्कर बुधवंत यांनी सदर ठिकाणी जात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली, असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर व पोलीस शिपाई भास्कर बुधवंत हे करत आहे.