नागपूर: गुन्हेगारी जगावर आधारीत क्राईम पेट्रोल मालिकेला लाजवेल अशी घटना नागपूरमध्ये उघड झाली आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना फसवण्यासाठी एका विकृत बापाने पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. धक्कादायक म्हणजे, या बापाने क्राईम पेट्रोल मालिका पाहून हत्येचा कट रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. गुड्डु छोटेलाल रजक (वय 40) असं या आरोपीचं नाव आहे. सुरुवातील ही मुलीने आत्महत्या केल्याची घटना भासवण्यात आली होती. आरोपी गुड्डु रजकने 6 नोव्हेंबर ला कळमना पोलीस स्टेशनमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा गुन्हा नोंदवला होता. पण पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर आलं असून बापाने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीलासोबत घेऊन मोठ्या मुलीला फाशी दिल्याचं उघड झालं आहे.
आरोपी गुड्डूची पहिली पत्नी आरती हिने विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याने कौशल्या पिपरडे या महिलेसोबत लग्न केलं.मृत मुलीने घटनेच्या आधी १० ते १५ दिवसांपूर्वी पिष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचा जीव वाचला. यावेळी तिने आपल्या नातेवाईकांकडे सावत्र आई त्रास देत असल्याचं सांगितलं होतं. एवढंच नाहीतर सावत्र आईचा भाऊ संतोष पिपरडे हा छेडखानी करतो, अश्लील चाळे करतो, त्यामुळे तिने मावशीला फोन करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर आरोप गुड्डूने मुलींना सावत्र आई आणि तिचे नातेवाईक त्रास देतात म्हणून त्यांना अद्दल घडविण्यासाठी मोठ्या मुलीला फाशी देत तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. आरोपी गुड्डूने सावत्र आई, मामा आणि मामी आपल्याला त्रास देत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईट नोट मुलीकडून लिहून घेतली होती. त्यानंतर मोठ्या मुलीला आत्महत्या करण्याचा देखावा कर असं सांगितलं आणि लहान मुलीला फोटो काढण्याचे सांगितले. घरात सर्वजण झोपी गेल्यानंतर आरोपी गुड्डूने देवघरामध्ये मुलीला स्टूलवर उभं केलं, सिलिंगला दोरी बांधली आणि फास तिच्या गळ्यात लटकवला.
लहान मुलीला फोटो काढण्यास सांगितलं आणि तेवढ्यात त्याने स्टूलला लाथ मारली. गळ्याला फास बसल्यामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आरोपी बापाच्या मोबाईलचे पोलिसांनी बारकाईने विश्लेषण केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी गुड्डू रजकला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.