‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि लेखिका सुधा मूर्तींनी नुकताच कोकण दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोकणाच्या नैसर्गिक सौदर्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. कोकणाच्या दौऱ्यादरम्यान जाणवलेल्या समस्यांवरदेखील त्यांनी भाष्य केलं. “कोकण हा स्वर्ग आहे. मात्र, या स्वर्गात जाणारे रस्ते खराब आहेत”, असं मूर्ती यांनी म्हटलं आहे. “गोवा, कर्नाटक, गुजरातमध्ये रस्ते चांगले आहेत. त्याचप्रमाणे येथेही चांगले रस्ते तयार केले पाहिजे”, असे मूर्ती यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दुर्गम भागातील बापर्डे येथील श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला त्यांनी भेट दिली होती. यावेळी केलेल्या भाषणात मूर्तींनी महाराष्ट्रातील रस्त्यांचा विकास झाला पाहिजे, असं म्हटलं आहे. “कोकण ही दिग्गजांची भूमी आहे. येथील लोक शिस्तप्रिय आहेत. या परिसराला निसर्गाचं वरदान आहे”, असेही मूर्ती यावेळी म्हणाल्या. शाळेतील कार्यक्रमात भाषण करताना मूर्ती यांनी मातृभाषेवर भर देण्याची आवश्यकता बोलून दाखवली. “मराठी ही केवळ भाषा नाही तर ही संस्कृती आहे”, असं मूर्ती यावेळी म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी मराठीसह इंग्रजी भाषेचाही सखोल अभ्यास केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान, सांगलीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. यावेळी सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पायाही पडल्या होत्या. या भेटीवरून समाज माध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मेहता पब्लिकेशनच्या योजना यादव यांनी फेसबुकवरुन सुधा मूर्ती यांची भेट संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांनी अगदी हट्ट करुन घेतल्याचं म्हटलं आहे. तसेच संभाजी भिडे हे वयस्कर वाटल्याने सुधा मूर्ती त्यांच्या पाया पडल्याचंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.