देवळा: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना देवळा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना रात्री साडेबारा वाजता त्यांची प्राणज्योती मालवली. शांतारामतात्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ आपला दबदबा राखला होता.

शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश झाला. देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे (वसाका) नऊ वर्ष अध्यक्षपद त्यांनी भूषविले. नंतर १० वर्षे ते कारखान्याचे संचालक होते. शरद पवार यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची शांतारामतात्यांना संधी मिळाली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून त्यांनी १५ वर्षे जबाबदारी सांभाळली. देवळा येथील शरदराव पवार पतसंस्थेचे ते संस्थापक होते.